अभाविपची निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : उडुपी येथील खासगी पॅरामेडिकल कॉलेजच्या शौचालयात विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडिओ काढण्यात आले आहेत. ही बाब शिक्षणक्षेत्रासाठी अतिशय लांच्छनास्पद आहे. त्यामुळे राज्य सरकारने संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. खासगी पॅरामेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या काही विद्यार्थिनींनीच सहकारी विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडिओ काढून ते व्हायरल केल्याची घटना घडली आहे. ही एक समाजविघातक कृती असून कोणत्या तरी उद्देशाने हे प्रकार घडले आहेत. असे प्रकार राज्याच्या इतर भागांमध्ये घडू नयेत. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. असे न झाल्यास राज्याची प्रतिमा मलीन होणार असून त्याचा परिणाम विद्यार्थिनींच्या शिक्षणावरही होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने कठोर कारवाई करण्याची मागणी अभाविपतर्फे करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने शिरस्तेदारांनी निवेदन स्वीकारले. यावेळी अभाविपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.









