बेळगाव बार असोसिएशनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : बेंगळूर येथे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि वरिष्ठ वकील वाय. आर. सदाशिव रेड्डी यांच्यावर हल्ला करून अनोळखीने मारहाण केली आहे. ही घटना बुधवार दि. 16 एप्रिल रोजी घडली असून या प्रकरणाचा तपास करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सोमवार दि. 21 रोजी बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार केला.
बेंगळूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. वाय. आर. सदाशिव रेड्डी यांच्यावर 16 एप्रिल रोजी अनोळखीने हल्ला करून मारहाण केली आहे. त्यांच्या कार्यालयातच ही घटना घडली आहे. त्यामुळे या घटनेचा राज्यातील वकिलांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. वकिलांवर वारंवार हल्ले होत आहेत. त्यामुळे सरकारने ही बाब गांभीर्याने घ्यावी, अॅड. वाय. आर. सदाशिव रेड्डी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा शोध घेऊन यांच्यावर कठोर कारवाई करण्याची सूचना पोलिसांना द्यावी, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.
हल्लेखोरांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. त्याचबरोबर वकिलांच्यासुरक्षेच्या दृष्टिकोनातून पावले उचलावीत, अशी मागणीदेखील करण्यात आली. अॅड. वाय. आर. सदाशिव रेड्डी यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. एस. एस. किवडसण्णावर, उपाध्यक्ष अॅड. बसवराज मुगळी, अॅड. शितल एम. रामशेट्टी, जनरल सेक्रेटरी अॅड. यल्लाप्पा दिवटे, जायन्ट सेक्रेटरी अॅड. विश्वनाथ सुलतानपुरी यांच्यासह बार असोसिएशनचे पदाधिकारी व वकील उपस्थित होते.









