वड्डरवाडी–रामनगर रहिवाशांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : वड्डरवाडी-रामनगर येथील नागराज बंडीवड्डर या निष्पाप तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन वड्डरवाडी- रामनगर रहिवाशांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिले. शिवबसवनगर येथील स्पंदन वसतीगृहाजवळ दि. 30 ऑगस्ट रोजी रात्री 9 वा. नागराज बंडीवड्डर हा घरी येत असताना काहीजणांनी त्यांचा फरशीने वार करून निर्घृण खून केला यामुळे नागराज याच्या कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, सहभागी असलेल्यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
कुटुंबीयांना 10 लाखाची भरपाई द्या
नागराज बंडीवड्डर हाच घरातील कर्ता होता. त्यामुळे घराची जबाबदारी त्याच्यावरच होती. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर संकट कोसळले आहे. निराधार झालेल्या कुटुंबीयांना आधाराची अत्यंत गरज आहे. वृद्ध आई-वडिलांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीविरोधात अॅट्रासिटी कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, निराधार झालेल्या मृत नागराजच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी नागेश अष्टेकर, शट्याप्पा कागलकर, गुंडू बडसकर, मारुती बडसकर, भीमराव पात्रोट, रवि गाडीव•र, हनुमंत गारगोटी, शामराव कागलकर आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









