गवळी समाजाची जिल्हाधिकारी-पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : शहरातील मंगळवार पेठ टिळकवाडी येथे कांही दिवसांपूर्वी मिळकतीच्या वादातून दिराकडून वहिनीचा जांबियाने वार करून भीषण खून करण्यात आला होता. यानंतर पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली. मात्र अद्याप या घटनेत सहभागी असलेल्या आरोपीचे कुटुंबीय मोकाट आहेत. त्यांना त्वरित अटक करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी गवळी समाजाच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे व जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना देण्यात आले.
गीता रणजीत दावले ऊर्फ गवळी (वय 45) हिचा दीर गणेश दावले ऊर्फ गवळी (वय 60) याने घरासमोरच जांबियाने सपासप वार करून खून केला. गीताने आरडाओरडा केल्यानंतर शेजारी सोडविण्यासाठी धावले. मात्र त्यांनाही जांबियाचा धाक दाखवत गणेशने घटनास्थळावरून पलायन केले. दरम्यान पोलिसांनी गणेशला अटक केली आहे. मात्र गणेशचे कुटुंबीय अद्याप मोकाटपणे फिरत आहेत. पूर्वनियोजित कट रचून गीताच्या खुनात सहभागी असलेल्या संबंधितांना पोलिसांनी अद्यापही अटक केली नसल्याने न्याय मिळण्यात अडचण येत आहे.
मृताच्या कुटुंबीयांचे संरक्षण व त्यांची सुरक्षितता प्रशासनाने सुनिश्चित करावी. या घटनेतील संबंधित अजूनही मृतांच्या मुलांना व प्रत्यक्षदर्शींच्या मुलांना गंभीर परिणामांची धमकी देत आहेत. यामुळे संबंधित आरोपी मोकाट असल्याचे यातून दिसून येते. प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन या घटनेतील सहभागींना त्वरित अटक करावे. त्याचबरोबर मृताचे कुटुंबीय व प्रत्यक्षदर्शींच्या कुटुंबीयांनाही संरक्षण देण्यात यावे. योग्य पडताळणी व तपासणी न करता गणेशला निष्काळजीपणे कर्ज देणाऱ्या बँकेवरही कठोर कारवाई करावी. गणेश व त्याचे संपूर्ण कुटुंबीय गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून कुटुंबातील एकमेव कमावती असलेल्या गीताचा निर्घृण खून करण्यात आला आहे. यामुळे या घटनेतील सहभागी आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली.









