शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानसह विविध संघटनांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे निषेध
बेळगाव : काश्मीर येथील पहलगाम येथे धर्मांध दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यात निष्पापांचे जीव गेले. त्याचबरोबर पश्चिम बंगाल येथील मुर्शिदाबाद येथे हिंदू धर्मियांवर अत्याचार करण्यात आले. हे प्रकार तात्काळ थांबवून दोषींवर कठोर कारवाई करावी. भारत सरकारने पाकव्याप्त काश्मीरवर कब्जा मिळवावा, अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या हिंदूंवर दहशतवाद्यांनी धर्म विचारून बेछूट गोळीबार केला. यामुळे देशातच हिंदू धर्मीय संकटात सापडले आहेत.
या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर द्यावे, अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर मुर्शिदाबाद येथे हिंदू लोकांवर अत्याचार करण्यात येत असून तेथील सरकार हिंदूंचे संरक्षण करू शकत नाही. याचा निषेध नोंदवत राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकरवी पंतप्रधानांना करण्यात आली. मृत हिंदू बांधवांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शिवप्रतिष्ठानचे कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे, जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील, शहरप्रमुख आनंद चौगुले, तालुकाप्रमुख परशुराम कोकितकर, कार्यवाह कल्लाप्पा पाटील, हिरामणी मुचंडीकर, प्रवीण मुरारी, मोहन जोई, विभागप्रमुख पुंडलिक चव्हाण, चंद्रशेखर चौगुले, किरण बडवाण्णाचे यासह धारकरी उपस्थित होते.
श्रीराम सेना हिंदुस्थानने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
काश्मीरच्या पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा श्रीराम सेना हिंदुस्थानने निषेध व्यक्त केला. दहशतवाद्यांवर कडक कारवाई करत असा हल्ला करण्याचा विचार पुन्हा त्यांच्या मनात येऊ नये, असे प्रत्युत्तर देण्याची मागणी श्रीराम सेनेने जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. देशात शांततेचे वातावरण असताना दहशतवाद्यांनी मंगळवारी हिंदू पर्यटकांवर हल्ला केला. यामध्ये 26 पर्यटकांचा हकनाक बळी गेला. एकीकडे देशाचे पंतप्रधान मैत्रीचा हात पुढे करत असताना दुसरीकडे शेजारील पाकिस्तानकडून मात्र भारतविरुद्ध कटकारस्थान केली जात आहेत. दहशतवादी हल्ला करून देशातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केली. चन्नम्मा चौकापासून निषेध रॅली काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बेळगाव शहर व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्रीराम सेनेचे भरत पाटील, राजू बैलूर, उमेश कुऱ्याळकर, नरू निलजकर, संदीप कामुले, आनंद आपटेकर यासह इतर उपस्थित होते.
हमारा देश संघटनेतर्फे निषेध फेरी
केवळ देशाबाहेर नाही तर देशातही हिंदूंना अमानुष हिंसाचाराचे बळी ठरावे लागत आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर अमानुष अत्याचार सुरू असून यामुळे केंद्र सरकारने तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, या मागणीसाठी बुधवारी हमारा देश संघटनेच्यावतीने रॅली काढून निषेध करण्यात आला. टिळकवाडी येथील पहिले रेल्वेगेटपासून आरपीडी कॉर्नरपर्यंत निषेध फेरीचे आयोजन करण्यात आले होते. पश्चिम बंगाल येथील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यासोबत हिंदूंना सुरक्षा पुरविण्याची मागणी करण्यात आली. तेथे हिंदू असुरक्षित असल्याने सामाजिक वातावरण गढूळ झाले आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करून तेथील हिंदूंना न्याय द्यावा, अशा घोषणा देण्यात आल्या. मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ सुधारणा कायद्याविरोधाच्या निदर्शनांना हिंसक वळण लागले. यामध्ये तिघांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले. तसेच मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून हे राज्य सरकारचे अपयश असल्याने केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी वेंकटेश शिंदे, अजित पाटील, ऋषिकेश गुर्जर, संदीप भिडे, नागेश कांबळे, मल्लिकार्जुन कोकणी, विशाखा ओझा, श्रीनिवास साखरे यासह इतर उपस्थित होते.
बार असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी घडलेल्या घटनेचा बेळगाव बार असोसिएशनने तीव्र शब्दात निषेध केला आहे. दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बार असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. पदाधिकारी व सदस्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन पंतप्रधानांच्या नावे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे संयुक्तपणे निवेदन सुपूर्द केले. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेला. दहशतवाद्यांच्या कृतीचा देशभरात निषेध करण्यात येत आहे. शांतपणे व्यवहार सुरू असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये आता अशांतता निर्माण झाली असून ही घटना देशाची एकता, शांतता, अखंडतेला बाधा आणणारी आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या निष्पाप पर्यटकांबद्दल आम्ही शोक व्यक्त करीत आहोत. त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आम्ही समर्थपणे उभे आहोत. जम्मू-काश्मीरबरोबरच देशातील अन्य पर्यटन स्थळांवर व्यापक सुरक्षा व्यवस्था तैनात करून पर्यटकांना स्वास्थ्य मिळवून द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध
पहलगाम येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यात निष्पापांचे जीव गेले आहेत. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने निषेध करण्यात आला आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) कर्नाटक राज्य पक्ष प्रवक्ता मुनिर लतिफ यांनी कळविले आहे.









