अजित डोवाल यांचे ब्रिटनच्या एनएसएला आवाहन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ब्रिटनचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सर टिम बॅरो सध्या भारत दौऱ्यावर आहेत. बॅरो यांनी शुक्रवारी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली आहे. दोन्ही देशांच्या एनएसएनी व्यापक द्विपक्षीय, क्षेत्रीय आणि जागतिक अजेंड्यावर विस्तृतपणे चर्चा केली आहे. डोवाल यांनी ब्रिटनमधील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांना धमकी देणाऱ्या उग्रवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी भूमिका बॅरो यांच्यासमोर मांडली आहे.
दोन्ही देशांच्या सुरक्षा सल्लागारांमध्ये चर्चा झाल्यावर शिष्टमंडळस्तरीय चर्चा देखील झाली आहे. खलिस्तान समर्थकांनी ब्रिटनसोबत अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियातील भारतीय मुत्सद्यांना धमकाविले आहे. भारतीय मुत्सद्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची सूचना भारताने या सर्व संबंधित देशांना केली आहे.
दहशतवाद आणि दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शविली आहे. महत्त्वपूर्ण आणि नव्या तंत्रज्ञानांप्रकरणी परस्पर स्वरुपात लाभदायक द्विपक्षीय सहकार्य दृढ करण्याचा संकल्प दोन्ही देशांच्या एनएसएनी घेतला आहे. हिंसक उग्रवाद आणि कट्टरवादाला सामोरे जाण्यासाठी सहकार्य वाढविण्यावर दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केली आहे.









