मुख्यंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा आदेश : साखर नासाडी प्रकरणही दक्षता खात्याकडे
प्रतिनिधी /पणजी
तुरडाळ नासाडी प्रकरणात सहाजण गुंतलेले असून त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दक्षता खात्याला दिले आहेत. शिवाय साखर खराब केल्याबद्दलची फाईलही दक्षता खात्याकडे पाठविण्यात आली असून त्यात दोषी असणाऱयांना शोधून काढण्याचे निर्देशही त्यांनी दक्षता खात्याला जारी केले आहेत.
त्यांनी पुढे सांगितले की, तुरडाळ नासाडी प्रकरणाची फाईल दक्षता खात्याकडून प्राप्त झाली असून त्यांनी केलेल्या चौकशीनुसार त्यात सहाजण सामिल असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे त्यांनी दक्षता खात्याला बजावले आहे.
साखर खराब केल्याप्रकरणी नागरी पुरवठा खात्याकडून फाईल आली असून ती चौकशी तसेच जबाबदारी ठरवण्यासाठी दक्षता खात्याकडे पाठविण्यात आली आहे. चणे व इतर अन्नधान्य खराब झाल्याची कोणतीही फाईल सध्या तरी आपल्याकडे आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तुरडाळ, साखर नासाडी प्रकरणात कोणालाही मोकळे सोडणार नाही. त्यात दोषी ठरणाऱयांवर जास्तीत जास्त कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉ. सावंत म्हणाले.
रु. 112 प्रति किलो दराने नागरी पुरवठा खात्याने तूरडाळ घेतली होती आणि ती रु. 83 प्रति किलो दराने विक्री करावे असे रेशन धान्य दुकानांना सूचित करण्यात आले होते परंतु रेशन कार्डधारकांनी त्या तुरडाळीस प्रतिसाद न दिल्याने ती गोदामातून धान्य दुकानदारांनी उचलली नाही. ती सर्व 12 तालुक्यातील गोदामात तशीच पडून राहिली. त्यानंतर तिची नासाडी झाल्याचे प्रकरण उघडकीस आले. आता दक्षता खाते आणि सरकार या प्रकरणात कोणती कारवाई करते याकडे संबंधितांचे लक्ष लागून राहिले आहे.









