तानाजी गल्ली, भांदूर गल्ली, फुलबाग गल्ली रहिवाशांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : मध्यवर्ती शहरातील तानाजी गल्ली, भांदूर गल्ली, फुलबाग गल्ली, महाद्वार रोड, रेल्वेगेट या मुख्य रस्त्यावर रेल्वे विभागाने दोन्ही बाजूला भिंती बांधल्या आहेत. यामुळे रहिवासी व सार्वजनिकांना मार्गक्रमण करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भिंतींच्या बाजूने असणाऱ्या लहान रस्त्यावरून नागरिक प्रवास करत होते. पण हा रस्ताही रेल्वेखात्याकडून बंद करण्यात येत आहे. याला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असून सदर रस्ता बंद न करता समस्येची दखल घेऊन वाहतुकीसाठी सुरूच ठेवण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
याठिकाणी रेल्वे ब्रिज निर्माण करताना सर्व्हेबाबत बहुतांश नागरिकांना माहिती नव्हती. तसेच काहीजण आपल्या स्वत:च्या फायद्यासाठी ब्रिजही नको, रस्ताही नको यासाठी सह्या केल्या. विकासकामांसाठी आमचा विरोध नसून रस्ता बंद न करता सार्वजनिकांना संचार करण्यासाठी अनुकूलता करून देण्यात यावी. रस्ता बंद होत असल्याने हजारो नागरिकांची गैरसोय होणार आहे. तसेच वळसा घालून सार्वजनिकांना प्रवास करताना अडचणी येत असून रस्ता पूर्ववतपणे सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली. सदर रस्ता बंद होत असल्याने या भागातील नागरिकांवर परिणाम होणार आहे.
तसेच आपत्कालीन वैद्यकीय सेवा व रुग्णवाहिका प्रवासावरही निर्बंध येणार आहेत. या रस्त्याशेजारी तीन सरकारी शाळा, चार ते पाच कन्नड व इंग्रजी शाळा आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यास अडचणी येणार आहेत. विद्यार्थी या रस्त्यावरून सायकलीवरून ये-जा करतात व जास्त रहदारी असणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करताना धोका उद्भवू शकतो. कामगार, व्यापारी, सरकारी नोकरदार व अनेक नागरिक या रस्त्यावरून प्रवास करतात. उत्तर व दक्षिण मतदारसंघाला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. तसेच गणपती, होळी व दसरा सणामध्ये हा रस्ता महत्त्वाचा ठरतो. यासाठी हा रस्ता बंद न करता पूर्वीप्रमाणे सुरू ठेवावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.









