मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची सूचना : वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसह जिल्हा रुग्णालयाला भेट
बेळगाव : माता आणि शिशूबाबत अधिक काळजी घ्यावी. जिल्हा रुग्णालयात (बिम्स) काही कमतरता असल्यास त्या शासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे महिला व बालविकासमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षणमंत्री प्रकाश पाटील यांच्यासमवेत शुक्रवार दि. 13 रोजी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांना भेटी दिल्या. तसेच यावेळी डॉक्टरांकडून त्यांनी माहिती जाणून घेण्यासह सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देऊन इमारतीची पाहणी केली. त्यानंतर दोन्ही मंत्र्यांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. काही समस्या आहेत का? याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या, माता आणि शिशूबाबत अधिक लक्ष देऊन बिम्सचे नाव कसे नावारुपाला येईल, यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना केली.
यावेळी जिल्हा रुग्णालयात तीन दिवसांच्या नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याबाबत पत्रकारांनी मंत्री हेब्बाळकर यांना प्रश्न विचारला. त्यावेळी मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या, साडेसहा महिन्यांची गर्भवती महिला पाय घसरून पडल्याने तिला तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यामुळे बैलहोंगल रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता अर्भकाची वाढ झाली नाही. त्याला सर्व उपचार देण्यात आले. मात्र, त्या अर्भकाचा मृत्यू झाला, असे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार राजू सेठ, वैद्यकीय विज्ञान विभागाचे मुख्य सचिव मोहम्मद मोहसीन, बिम्सचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी, अधीक्षक डॉ. इराण्णा पल्लेद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विठ्ठल शिंदे, शिल्पा वाली, डॉ. सरोज तगडी, डॉ. उमेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.









