महिला पोलिसांची नेमणूक करा : भारतीय संस्कृती फाऊंडेशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : महिलांवर अत्याचार केल्या जाणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पोलीस स्थानकामध्ये अशा घटनांची नोंद होत असताना दिसत असून, पोलीस प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलावीत. शहरामध्ये असणाऱ्या महिला पोलीस स्थानकात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह महिला पोलिसांची नेमणूक करण्यात यावी, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारतीय संस्कृती फाऊंडेशनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 2023 ते 2024 या वर्षभरात महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटनात वाढ झाली आहे. बेळगाव तालुक्यातील न्यू वंटमुरी, घटप्रभा, बैलहोंगल तालुक्यातील तिगडी येथे महिलांच्याबाबतीत अक्षम्य गुन्हे घडले आहेत. अशा घटना पाहिल्या असता समाजात महिला असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
आवश्यक पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करा
जिल्हा व शहर महिला पोलीस स्थानकांमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्यांचीच नेमणूक करण्यात यावी. त्या ठिकाणी महिला पोलीस कर्मचारीच तक्रार दाखल करून घेण्यासाठी नियुक्त करण्यात यावेत. आश्चर्याची बाब म्हणजे महिला पोलीस स्थानकात होमगार्ड कर्मचाऱ्यांकडून महिलांच्या समस्या ऐकून घेतल्या जात आहेत. याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेऊन आवश्यक पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. घरकामे करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. अशी घरगुती कामे करून संसाराचा गाडा चालविणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठीही उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा प्रमोदा हजारे, सुनीता सुभेदार, अनुराधा सुतार, मंदा नेवगी, सुधा भातकांडे, उर्मिला मण्णूरकर, शांता जाधव, रेखा अन्नीगेरी, प्रीती लोहार, अंजना लोहार आदी महिला उपस्थित होत्या.









