पुणे : डीआरडीओचा संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याने अतिशय संवेदनशील आणि गोपनीय माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाला दिली आहे. त्यामुळे त्याच्या जामिनावरील सुनावणी ही इन कॅमेरा घेण्याची मागणी एटीएसने न्यायालयात केली.
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याप्रकरणी अटकेत असलेला डीआरडीओचा संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी सुरु आहे.
बचावपक्षाच्या वतीने ॲड ऋषिकेश गानू यांनी कुरुलकर याची बाजू मांडताना न्यायालयात सांगितले की, डॉ. प्रदीप कुरुलकर तपासात सर्व सहकार्य करत आहे. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक डिवाइसच्या न्यायवैद्यकीय अहवाल सुद्धा एसटीएसला प्राप्त झाला आहे. कुरुलकर याने दिलेली माहिती हे पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध असल्याचे गानू यानू न्यायालयात सांगितले.
दरम्यान, विशेष सरकारी वकील ॲड. विजय फरगडे यांनी न्यायालयात सांगितले की, कुरुलकर याने अतिशय संवेदनशील आणि गोपनीय माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाला दिली आहे. ही माहिती अजूनही गुगल किंवा पब्लिक डोमेनमध्ये उपल्बध नाही. या प्रकरणाचा अजून तपास सुरु आहे. ही माहिती बाहेर आल्यास देशाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही सुनावणी इन कॅमेरा घेण्यात यावी. या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 सप्टेंबर रोजी होणार आहे.








