जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची अधिकाऱ्यांना सूचना : जि. पं. मध्ये विकास आढावा बैठक
बेळगाव : ग्राम पंचायत हद्दीतील केईबी सबस्टेशन, मोबाईल टॉवर व विंडमिल यांच्याकडून थकीत असलेल्या कर वसुलीसाठी उपक्रम हाती घेऊन कर वसुलीत 100 टक्के प्रगती साधावी, अशी सूचना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केली. जिल्हा पंचायतीच्या सभागृहात मंगळवार दि. 9 रोजी झालेल्या जिल्हा व तालुकास्तरीय विविध खात्यांच्या विकास आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून शिंदे बोलत होते.
‘सकाल’ योजनेंतर्गत थकीत असलेल्या अर्जांवर पुढील दोन दिवसांत विचार करून निर्णय द्यावा. नागरिकांना कोणत्याही प्रकारे समस्या येऊ नयेत याची दखल घ्यावी. पुढील दिवसात अधिकाऱ्यांकडून काही चूक दिसून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. 15 व्या वित्त योजनेंतर्गत कामे होणाऱ्या जागांची पाहणी करावी. योग्य कामांची नोंद घेऊन कामात प्रगती साधावी. जिल्ह्याच्या काही भागात ग्राम पंचायतींच्या इमारतींचे काम सुरू असून बांधकाम वेळेत पूर्ण करण्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.
जलजीवन मिशन योजनेंतर्गत कामे पूर्ण करून ग्राम पंचायतीकडे हस्तांतर करण्यात यावे. त्यानंतर ‘हर घर जल ग्राम’ ची घोषणा करावी. ग्राम पंचायत हद्दीतील पाणी संग्रह केंद्रांची स्वच्छता करण्यात यावी, प्रत्येक गावासाठी पिण्याच्या पाण्याची परीक्षा करूनच पाणीपुरवठा करण्यात यावा, शुद्ध पाणीपुरवठा विभाग कार्यरत असल्याची खातरजमा करून घ्यावी, तालुका पंचायत व ग्राम पंचायत हद्दीतील शुद्ध पिण्याचे पाणी विभाग योग्यरितीने कार्यरत असल्याची पाहणी करून त्याचा अहवाल जिल्हा पंचायतीला सादर करावा.
पाणी शुद्धीकरण केंद्रांकडे वारंवार लक्ष द्यावे. स्वच्छ भारत मिशन संबंधित जिल्ह्यातून 13 तालुक्यांमध्ये पीडब्ल्यूएम विभागात प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट मशीन 2 ऑक्टोबरपूर्वी बसवून त्याचे लोकार्पण करण्यात यावे. वैयक्तिक शौचालय बांधकाम वेळेत पूर्ण करण्यात यावे. त्याचबरोबर आदर्श गावांची घोषणा करावी. गोकाक तालुक्यात सुरू असलेले एमआरएफ विभागाचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. रोहयोअंतर्गत ग्रामीण जनतेला सलगपणे हाताना काम देऊन यंदाच्या वर्षाचे उद्दिष्ट साधावे.
त्याचबरोबर रयत संघ व ग्रामीण कुली कामगार यांची तालुकास्तरावर संयुक्तपणे बैठक घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात. तसेच त्यांना कामेही द्यावीत, अशी सूचना तालुका पंचायतीच्या कार्यकारी अधिकारी व ग्रामीण उद्योग विभागाच्या साहाय्यक संचालकांना केली. एनएमएमएसबाबत दररोज ग्राम पंचायत व तालुका पंचायतमार्फत संबंधित अधिकाऱ्यांनी चोखपणे पाहणी करावी. लेखापरीक्षणाबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे वेळीच पूर्ण करावीत, अशी सूचनाही शिंदे यांनी केली. जिल्हा पंचायतीचे उपसचिव बसवराज हेग्गनायक, बसवराज अडवीमठ, योजना संचालक रवी बंगारेप्पन्नवर, मुख्य लेखापाल परशुराम दुडगुंटी, मुख्य योजना अधिकारी गंगाधर दिवटर यांसह विविध खात्याचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी बैठकीला उपस्थित होते.









