जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांची ग्राम पंचायतींना सूचना
बेळगाव : बालविवाह रोखण्यासाठी ग्राम पंचायतीनी आवश्यक उपक्रम हाती घ्यावेत. जनजागृती करण्यात यावी. मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांनी केल्या. मुडलगी तालुक्यातील हुनशाळ पी. जी. ग्राम पंचायत कार्यालयाला जि. पं. सीईओ शिंदे यांनी मंगळवारी भेट देऊन ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांशी संवाद साधला. ग्रामीण भागातील मुलांनी मोठ्या पदापर्यंत पोहोचले पाहिजे. त्या दृष्टीने ग्रा. पं. ने मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. सरकारी शाळांना सुविधा मिळाल्या पाहिजेत, असे शिंदे म्हणाले.
त्यानंतर, जि. पं. सीईओ शिंदे यांनी ग्रंथालय, गावातील बाजार, सरकारी शाळा, पूरग्र्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. नजिकच्या वडेरहट्टी ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील निवासी शाळा व अंगणवाडी केंद्राला भेट देऊन मुलांशी संवाद साधला. बळोबाळ (ता. गोकाक) ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्याचबरोबर सरकारी माध्यमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गोकाक शहरातील सरकारी रुग्णालय ‘नम्म क्लिनीक’ला भेट दिली. गोकाक तालुका पंचायत कार्यालयातील नूतनीकरण कामाची पाहणी केली. उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याची सूचना संबंधीतांना केली.
गोकाक शहरातील ज्युनियर
कॉलेजच्या सभागृहात मुडलगी व गोकाक तालुक्यातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन विकासकामांचा आढावा घेतला. महापुरामुळे होणारी हानी टाळण्यासाठी खबरदारीची उपाययोजना हाती घेण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली. शाळा विकासाची कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत. कर वसुली निर्धारित वेळेत करावी, अशा सूचनाही केल्या. मुडलगी तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी एफ. जी. चिन्नण्णवर, गोकाक ता. पं. कार्यकारी अधिकारी परशुराम घस्ते, साहाय्यक कार्यकारी अभियंत उदयकुमार कांबळे, गटशिक्षणाधिकारी अजित मण्णीकेरी, बालकल्याण योजनाधिकारी यल्लाप्पा गदाडी यासह अन्य अधिकारी विकास आढावा बैठकीला उपस्थित होते.









