खानापूर नगरपंचायत स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा : 1 कोटी 20 लाख दुकानगाळे भाडे थकीत
खानापूर : मंगळवार दि. 28 रोजी नगरपंचायतीच्या सभागृहात स्थायी समितीची बैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी विनोद पाटील होते. यावेळी नगराध्यक्ष नारायण मयेकर यांच्या उपस्थितीत बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. मुख्याधिकारी आर. के. वठार यांनी उपस्थितांचे स्वागत करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. प्रेमानंद नाईक यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त वाचून दाखविले. यानंतर माजी स्थायी कमिटीचे चेअरमन प्रकाश बैलूरकर यांनी नगरपंचायतीच्या शहरातील विविध ठिकाणी असलेल्या 68 दुकान गाळ्यांचे थकीत भाडे सुमारे 1 कोटी 20 लाख रुपये वसूल करण्यास नगरपंचायतीचे अधिकारी का टाळाटाळ करत आहेत, असा प्रश्न विचारुन थकीत भाडे वसूल करण्यासंदर्भात काय उपाययोजना केली आहे. याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. यावेळी नगराध्यक्ष नारायण मयेकर यांनी, दुकान गाळ्यांच्या भाडे वसुलीबाबत अधिकाऱ्यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करून भाडे वसूल करण्यात यावे, असे सूचविले. तर स्थायी कमिटीचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी भाडे वसूल करण्यासंदर्भात कठोर पावले उचलावित व भाडे वसूल करण्यात कोणाचीही गय करू नये, तसेच नव्याने सवाल करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशी सूचना केली. यावेळी मुख्याधिकारी आर. के. वठार यांनी भाडे वसूल करण्यासंदर्भात योग्य तो क्रम घेऊ, असे सांगितले. या बैठकीत मिनाक्षी बैलूरकर, अप्पय्या कोडोळी, हणमंत पुजार, शोभा गावडे, राजश्री तोपिनकट्टी, सायरा सनदी, फातिमा बेपारी यासह विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
हंगामी कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने कायम करू
यावेळी नगरपंचायतीच्या हंगामी कामगारांनी आपल्याला सेवेत कायम करून घ्यावे, अशा मागणीचे निवेदन देवून शासनाने ज्या सूचना केल्या आहेत, त्याप्रमाणे आम्हाला सेवेत कायमस्वरुपी नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी आर. के. वठार यांनी सरकारच्या सूचनेनुसार टप्प्याटप्प्याने कामगारांना सेवेत कायम करून घेण्यात येणार आहे, असे सांगितले. शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, तसेच शहरात असलेल्या पाण्याच्या टाक्या दर महिना स्वच्छ करण्यात याव्यात, अशा सूचना केल्या गेल्या. शहरातील पथदीपांची देखभाल व्यवस्थितरित्या करण्यात यावी, यासबंधी खात्याने शहरातील पथदीपांची वेळोवेळी पाहणी करून उपाययोजना करावी, अशा सूचना करण्यात आल्या.









