मंत्री के. वेंकटेश यांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बैठकीत सूचना
बेळगाव : जनावरांना वेळेत औषधोपचार आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करा. लसीकरण, चारा संकलन यासह रोग नियंत्रणाच्या उपाययोजना तातडीने राबवा. फिरत्या पशुवैद्यकीय वाहनांचा वापर करून जनावरांच्या गोठ्यापर्यंत सुविधा पुरवा, अशा सूचना पशुसंगोपन मंत्री के. वेंकटेश यांनी केल्या आहेत. बेळगाव विभागीय जिल्हा विकास आढावा बैठक सोमवारी पार पडली. यावेळी मंत्री वेंकटेश यांनी सात जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकारी आणि तालुका योजना अधिकाऱ्यांना सूचना केल्या. पशुपालक शासनाच्या योजनांबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे अनेक सुविधांपासून वंचित राहतात. अशा ठिकाणी योजना आणि सुविधा पुरविण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे. उत्तर कन्नड, उडपी, गदग जिल्ह्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे. भरतीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा. दरम्यान, कार्यरत असलेले पशुवैद्यकीय अधिकारी जनावरांवर वेळेत उपचार करतात की नाही? याची तपासणी करावी.
बेळगाव जिल्ह्यातील 12 लाख 25 हजार जनावरांना लाळ्या-खुरकत लसीकरण केले आहे. शिवाय लम्पीचा प्रादुर्भावदेखील आटोक्यात आला आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये शेळ्या, मेंढी पालनासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. तर 109 जणांना शेळी, मेंढी शेडसाठी मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्यात 276 लहान, मोठे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यामध्ये 17 फिरती पशुवैद्यकीय वाहने कार्यरत आहेत. या माध्यमातून जनावरांना सर्व सुविधा पुरविल्या जात आहेत, अशी माहिती बेळगाव पशुसंगोपनचे सहसंचालन डॉ. राजीव कुलेर यांनी दिली. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात 170 गोवर्गीय जनावरांचा लम्पीने मृत्यू झाला आहे. नुकसानग्रस्तांना मदत देण्यात आली आहे. उर्वरितांनादेखील लवकर भरपाई दिली जाणार आहे. पशुसंगोपन विभागाच्या सचिव सलमा फहीम यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. जनावरांना रोगमुक्त ठेवण्यासाठी सक्तीने लसीकरण करावे. विभागातील अधिकाऱ्यांनी जबाबदारीने कामे करावीत. अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांनी चारा छावण्या आणि इतर गोष्टींकडे लक्ष द्यावे. अशा सूचना केल्या. यावेळी जि. पं. सीईओ हर्षल भोयर, मंजुनाथ पालेगार यासह बेळगाव, बागलकोट, गदग, हावेरी, उत्तर कन्नड, विजापूर जिल्ह्यातील सहसंचालक, साहाय्यक संचालक, मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी, योजना अधिकारी उपस्थित होते.









