माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा काँग्रेसला टोमणा
प्रतिनिधी/ बेंगळूर
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपविरोधात लढा देण्यासाठी काँग्रेस पक्ष विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, काँग्रेसच्या या भूमिकेबद्दल माजी पंतप्रधान आणि निजदचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांनी काँग्रेसला टोमणा हाणला आहे. काँग्रेसने आधी स्वत:चे घर सांभाळण्यावर भर द्यावा, असे देवेगौडा यांनी म्हटले आहे. काँग्रेस हा एकमेव विरोधी पक्ष नाही. विरोधी पक्षांकडे इतरही अनेक पर्याय आहेत. कर्नाटकात निजद पक्ष केवळ ठराविक प्रदेशापुरताच मर्यादीत असल्याचा प्रचार काँगेस-भाजपने केला आहे. मात्र, कोणत्याही क्षणी निजद पक्ष मुसंडी मारून सत्तेवर येऊ शकतो, असेही देवेगौडा म्हणाले.
एका खासगी वृत्तासंस्थेला दिलेल्या मुलाखतीत देवेगौडा यांनी राजकारणासह विविध मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसकडून सत्ताधारी भाजपविरुद्ध विरोधी पक्षांची मोट बांधण्यात येत असल्याबद्दल बोलताना ते म्हणाले, काँग्रेसने आधी आपल्या पक्षांतर्गत गोष्टी व्यवस्थित करायला हव्यात. देशात तिसरी आघाडी उदयास येऊ शकते. राष्ट्रीय स्तरावर लोकसभेसाठी तिसरी आघाडी तयार होण्याची शक्मयता आहे. जर तिसरी आघाडी निर्माण झाली तर देश आणि लोकशाहीचे रक्षण करणे हे या आघाडीचे प्राधान्य असेल, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीविषयी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना देवेगौडा यांनी देशातील कृषीविषयक समस्या, कृषी कायदे, कोविड, केंद्रीय अर्थसंकल्प, अर्थव्यवस्था, ईशान्येकडील राज्ये, काश्मीरची समस्या यासह विविध मुद्द्यांवर आपण राज्यसभेतील कामकाजावेळी मी विस्तृतपणे बोललो आहे. वयाच्या 91 व्या वर्षीही आपण जागरुकपणे मत मांडत असल्याचे सांगितले.
निवडणुकीचा राष्ट्रीय राजकारणावर परिणाम
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचा राष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम होईल? या प्रश्नाला उत्तर देताना देवेगौडा म्हणाले, कर्नाटकमधील निवडणू तसेच इतर राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची दिशा ठरवतील. यापूर्वीही असे घडल्याची उदाहरणे आहेत. या वेळीही असेच घडेल. कठोर परिश्र्रम आणि विकासाची दृष्टी यामुळे आम्हाला लोकसभा निवडणुकीवेळी विजय साध्य करण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे.
निजदचा सर्वसमावेशक दृष्टिकोन
ज्या लोकांनी केवळ भाजप आणि काँग्रेसवर लक्ष केंद्रित केले आहे, ते कर्नाटकातील निवडणूक निकालानंतर आश्चर्यचकीत होतील. राष्ट्रीय पक्ष मोठे आणि खोटे दावे करतात. आपला निजद पक्ष सर्वसमावेशक विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून राज्यातील निवडणुकीत मते मागत आहे. कुमारस्वामी यांनी नुकताच राज्याचा दौरा पूर्ण केला आहे. आपला पक्ष कठोर परिश्र्रम करण्यावर विश्वास ठेवतो, लोकांमध्ये फूट पाडण्यावर आमचा मुळीच विश्वास नाही, असे ते म्हणाले.









