आरोग्य विभागातर्फे मार्गदर्शक प्रणाली जाहीर
बेळगाव : उन्हाच्या तप्त झळांनी रस्ते भाजून निघत आहेत. तर नागरिकांना उन्हाचा तीव्र तडाखा बसतो आहे. अंगाची लाही लाही होत असून भर मध्यान्ही म्हणजे 12 ते 4 बाहेर फिरणे अशक्य होत आहे. हवामानातील बदल हा आता त्रासदायक ठरू लागला आहे. बेळगावचे तापमानसुद्धा वाढत चालले आहे. त्यामुळे जो तो सावली शोधू लागला आहे. गतवर्ष हे जागतिक स्तरावरच अत्यंत उष्ण वर्ष म्हणून नोंद झाले होते. मात्र 2025 हे वर्ष 2024 वर मात करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यंदाच्या फेब्रुवारीपासूनच उष्मा जाणवू लागला आहे. फेब्रुवारीचा महिना हा मागील 125 वर्षांनंतरचा अत्यंत उष्ण महिना म्हणून नोंद झाला आहे. आणखी दोन ते तीन महिने उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. उन्हापासून व उकाड्यापासून बचावासाठी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. 1901 नंतर 2024 हे अतिउष्ण म्हणून ओळखले गेले होते. भारतीय हवामान खात्याने तशी नोंदही केली होती. या काळात मार्चपासून मे पर्यंत देशात 54 दिवस उष्णतेची लाट आली होती. दक्षिण भारतातही उष्णता अधिक जाणवत होती. यंदाच्या उन्हाळ्याला सामोरे जाण्यासाठी केंद्रीय आरोग्य खाते, हवामान खाते व संबंधित राज्यातील सरकारांनी उपाययोजना सांगितल्या आहेत. यासंबंधीची मार्गसूचीही जारी केली आहे.
उष्णतेचे आरोग्यावरील परिणाम
उन्हामध्ये शारीरिक परिश्रमाची कामे करताना स्नायू आखडणे, सूज येणे, सारखी तहान लागणे, कंटाळवाणे वाटणे, डोके गरगरणे, डोकेदुखी, उलट्या येणे, पित्त, पोट खळखळणे, असे विकार निर्माण होण्याची शक्यता आहे. उन्हाच्या झळा न सोसवून भोवळ येणे, बेशुद्ध पडणे, यामुळे जीव जाण्याचा प्रकार घडण्याची शक्यता आहे. अशक्त व्यक्ती, वृद्ध, गंभीर आजाराने त्रस्त असलेल्यांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. वाढत्या उन्हाच्या झळांपासून संरक्षण करण्याबाबत राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने मार्गसूची जाहीर केली आहे.
मार्गसूची…
- अधिक ऊन असलेल्या कालावधीत म्हणजे दुपारी 12 ते 3 यावेळेत घराबाहेर पडू नका, शारीरिक परिश्रमाची कामे टाळा.
- अधिकाधिक पाणी प्या.
- फिकट रंगाचे व सैल, सुती कपडे वापरा.
- उन्हात घराबाहेर जाण्याचा प्रसंग आल्यास गॉगल, टोपी, छत्रीचा वापर करा, पादत्राणे वापरा.
- प्रवास करताना सोबत पाण्याची बाटली असावी.
- अल्कोहोल, चहा, कॉपी, कार्बोनेटेड थंडपेये पिण्याचे टाळा. यांचे सेवन करणे म्हणजे डीहायड्रेशन (निर्जलीकरण) होऊ शकते, याची दखल घ्या.
- लिंबूचे सरबत, ताक यासारखी पेये आवश्य घ्या. ही पेये घरात बनविलेली असल्यास उत्तमच.
- ताज्या आहाराचे सेवन करा.
- उन्हामध्ये लहान मुले, प्राण्यांना सोडू नका.
- प्राणी, जनावरांना निवाऱ्याखाली बांधा, त्यांना पिण्यासाठी पाणी ठेवा.
- भोवळ येणे, मळमळणे यासारख्या तक्रारी सुरू झाल्यास डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्या.









