जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन : व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांना सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्ह्याच्या शहर आणि ग्रामीण भागात आतापर्यंत कोठेही पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवलेली नाही. यापुढेही समस्या येऊ नये, याची दखल घ्यावी. दूषित पाणीपुरवठा होणार नाही याचीही दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शनिवारी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. स्थानिक संस्थांनी उन्हाळ्यात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असणारे अनुदान राखून ठेवावे, तालुकास्तरावर कृती दलांच्या (टास्क फोर्स) वेळोवेळी बैठका घेण्यात याव्यात, पाण्याची कमतरता भासणार नाही, अशादृष्टीने कृती हाती घ्यावी. अथणी परिसरात यंदा पाण्याची पातळी मागील वर्षाच्या तुलनेत अधिक आहे. पाण्याची पातळी खालावलेल्या जलाशयांची पाहणी करून आवश्यक असणाऱ्या भागाला सुरळीतपणे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी तयारी ठेवावी, महानगरपालिकेने शहरातील ट्रॅफिक सिग्नलच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी तात्पुरती केंद्रे उभारावीत, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे म्हणाले, दुष्काळ म्हणून घोषणा झालेल्या भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी तालुकास्तरावर निविदा मागवाव्यात. अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, प्रांताधिकारी श्रवण नायक, महापालिका आयुक्त शुभा बी., बेळगावचे तहसीलदार बसवराज नागराळ, जिल्हा नगरविकास कोषचे योजना संचालक मल्लिकार्जुन कलादगी, कृषी खात्याचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, जिल्हा आरोग्य-पुटुंब कल्याण अधिकारी ईश्वर गडादी यांसह विविध खात्यांचे अधिकारी, तसेच सर्व तालुक्यांच्या तहसीलदारांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये भाग घेतला होता.
जनावरांसाठी मुबलक चारा…
यंदा जनावरांसाठी चाऱ्याची कमतरता नाही. चारा केंद्रांमध्ये मुबलक चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर जनावरांना उद्भवणारे आजार नियंत्रणासाठी दक्षता घेण्यात आली आहे, असे पशुसंगोपन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.









