सोनिया गांधी यांचे हुबळीतील प्रचारसभेत आवाहन
वार्ताहर / हुबळी
महात्मा बसवेश्वर यांचा जन्म याच भूमीत झाला. त्यांनी कोणालाही न घाबरता समानतेसाठी लढा दिला. ही कुवेंपू यांची भूमी आहे. मात्र, भाजप त्यांच्या तत्त्वांचा सातत्याने अपमान करत आहे. देशाचा इतिहास आणि कर्नाटकचा सामाजिक न्यायाचा वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न करू नका. भाजप आपल्या राजकीय स्वार्थासाठी राज्य आणि देशाचे विभाजन करत आहे. गेल्या चार वर्षांत भाजपने राज्याला कोणत्या अवस्थेत आणले आहे, हे सर्वांनी पाहिले आहे. तुम्ही सर्वांनी अशा सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्याची शपथ घेतली पाहिजे, असे आवाहन काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी केले.

शनिवारी सायंकाळी हुबळी येथील जाहीर सभेत बोलताना त्यांनी भाजपवर घणाघात केला. राज्य विधानसभा निवडणुकीतील त्यांची ही पहिली प्रचारसभा आहे. त्या म्हणाल्या, राज्य परिवर्तनाचा दिवस जवळ आला आहे. समाजात द्वेष पसरवणाऱ्यांविरोधात लढा देण्यासाठी ‘भारत जोडो यात्रा’ काढण्यात आली. भाजपच्या या द्वेषपूर्ण राजकारणातून देशाला मुक्त केल्याशिवाय कर्नाटक आणि देशाचा विकास होऊ शकत नाही. यासाठी लाखो लोक राहुल गांधींसेबत 4 हजार कि. मी. पदयात्रेत पायी चालले आहेत. भाजपला या यात्रेची इतकी भीती वाटत आहे की ते सर्व प्रकारची रणनीती आखत आहेत. आज सत्तेत असणारे सरकार लोकांचे रक्षण करण्याऐवजी पैशांची लूट करत आहेत, असा आरोपही सोनिया गांधी यांनी केला.
भाजप नेत्यांकडून धमकी
जनतेने 2018 मध्ये भाजपला सत्ता दिली नाही. मात्र, ते सरकार उलथवून सत्तेवर आले. नंतर या 40 टक्के कमिशनच्या सरकारने राज्याची लूट केली. अहंकारी असलेले भाजपचे नेते एकाही प्रश्नाला उत्तर देत नाहीत. कोणत्याही पत्राला उत्तर देत नाहीत. संवैधानिक संस्थांचा दुरुपयोग करून ते सर्व परिस्थिती नियंत्रित करत आहेत. अशा प्रकारचा गलथान कारभार कोणत्या सरकारमध्ये पहावयास मिळाला आहे का,? लोकशाही अशी चालते का?, असे प्रश्नही सोनिया गांधी यांनी उपस्थित केले. भाजपला निवडून आणले नाही तर कर्नाटकाला मोदींचा आशीर्वाद मिळणार नाही. भाजपचा पराभव झाला तर राज्यात दंगली होतील, अशी धमकी त्या पक्षातील नेते उघडपणे देत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
10 मे रोजी जनता येथील मातीची ताकद दाखवेल
भाजपने कर्नाटकातील लोकांना मूर्ख समजू नये. येथील जनता इतर कोणाच्याही आशीर्वादावर नव्हे, तर स्वत:च्या मेहनतीवर आणि जिद्दीवर अवलंबून आहे. जनता लोभी नाही, पोकळ धमक्मयांना येथील जनता घाबरत नाही. 10 मे रोजी कर्नाटकची जनता येथील मातीची ताकद दाखवून देईल, असे त्या म्हणाल्या.
जनतेच्या विश्वासासाठी पाच ‘गॅरंटी’ योजना राबवणार
संतांच्या मूलतत्त्ववादावर हल्ला करणाऱ्यांची बाजू घ्यायची की सर्व वर्गाच्या कल्याणासाठी लढणाऱ्यांची बाजू घ्यायची, हे जनतेनेच ठरवावे. हे राज्य लूटमार आणि कमिशनपासून मुक्त झाले पाहिजे. सामाजिक न्यायाचा, सद्भावनेचा वारसा जपण्यासाठी सत्याच्या बाजूने उभे राहण्याचा निर्धार करा. काँग्रेस सरकारने राजस्थान, छत्तीसगड, हिमाचलमध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. सत्तेत आल्यानंतर कर्नाटकातील काँग्रेस सरकार जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी पाच ‘गॅरंटी’ योजना राबवणार आहे. गृहलक्ष्मी, युवानिधी, अन्नभाग्य, गृहज्योती आणि मोफत प्रवास योजना राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारविरोधात आवाज उठवणे कर्तव्य
काँग्रेसच्या इतिहासात कर्नाटक राज्याला विशेष स्थान आहे. मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. ही अभिमानाची बाब आहे. इंदिरा गांधी यांनी केंद्राच्या जनविरोधी धोरणांविऊद्ध लढा दिला. तेव्हा चिक्कमंगळूरमधील लोक त्यांच्या समर्थनार्थ उभे राहिले. 25 वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली, तेव्हा बळ्ळारीतील जनतेने मला पाठिंबा दिला. सध्याच्या अंध:कारमय काळात सरकारच्या विरोधात आवाज उठवणे हे आपले कर्तव्य असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या.









