वेंगुर्ले :
शासनाने सर्वसामान्य व बेघर असलेल्या कुटुंबास राहण्यासाठी स्वत:चा हक्काचा निवारा देण्यासाठी पंतप्रधान आवास घरकुल योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा लाभ गावातील प्रत्येक बेघर कुटुबांने घ्यावा, असे प्रतिपादन उभादांडा सरपंच नीलेश चमणकर यांनी उभादांडा ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात आयोजित लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र व पहिला हप्ता वितरण कार्यक्रमात केले.
उभादांडा गावच्या महसुली गावातील शासनाच्या पंतप्रधान आवास घरकुल योजना लाभ मिळालेल्या 13 बेघर लाभार्थ्यांना शासनाच्या घरकुल योजनेचे मंजुरीचे पत्र व घरी बांधण्यासाठी शासकीय योजनेद्वारे प्राप्त झालेल्या पहिला हप्ता देण्याचा कार्यक्रम उभादांडा सरपंच चमणकर यांच्या हस्ते झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वेंगुर्ले पंचायत समितीचे माजी सभापती जयप्रकाश चमणकर तसेच सामाजिक कार्यकर्ते वसंत तांडेल यांचे हस्ते मंजूर पत्र लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. यावेळी जयप्रकाश चमणकर म्हणाले, गावात एकही कुटुंब बेघर राहू नये, यासाठी पंतप्रधान आवास योजना प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी श्री. देसाई, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी श्री. देसाई यांनी केले तर आभार ग्रामपंचायत सदस्य गणेश चेदवणकर यांनी मानले.








