पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची विकास आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना : उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र बैठक घेणार
बेळगाव : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या लोकार्पणास आधीच उशीर झाला आहे. त्यामुळे आरोग्य सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करून येत्या काही दिवसांत रुग्णालय सुरू करण्याची कार्यवाही करावी, अशी सूचना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली. शुक्रवारी सुवर्णसौध येथे त्रैमासिक विकास आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी व्यासपीठावर विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, खासदार इराण्णा कडाडी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, आमदार राजू कागे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आदी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील जलाशयामध्ये औद्योगिक प्रयोजनासाठी किती पाणी आरक्षित आहे याची सर्वंकष माहिती व शासनाच्या आदेशाचा आढावा घेऊन कार्यवाही करण्याबाबत चर्चा करण्यात आली. उद्योग उभारणीसाठी जिल्हा प्रशासन व संबंधित विभागाकडून आवश्यक ते सहकार्य केले जात आहे.
जिल्ह्यात पुरेशी सरकारी जमीन उपलब्ध नसल्याने सध्या मोठ्या प्रमाणात उद्योग निर्मितीसाठी जमीन देणे शक्य नाही. मात्र खासगी जमिनी खरेदी करून उद्योग उभारणीसाठी सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जातील, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. उद्योजकांना कसे प्रोत्साहन देता येईल व मोठ्या उद्योगांना कसे आकर्षित करता येईल, यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेतली जाईल, असेही ते यावेळी म्हणाले. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे लवकर उद्घाटन करून जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विधानपरिषद सदस्य नागराज यादव यांनी केली. वैद्यकीय महाविद्यालयांच्या अखत्यारित येणाऱ्या जिल्हा रुग्णालयांच्या कारभारास जिल्हा प्रशासनावर मोठी जबाबदारी सोपविण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती कारवाई करावी, अशी विनंती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली. तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करून रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी बेळगाव शहरात सरकारी कॅन्सर हॉस्पिटल सुरू करण्यासंदर्भात त्यांनी भूमिका मांडली.
शाळांना पायाभूत सुविधा पुरविल्या जाव्यात. रोजगार निर्मितीसाठी, उद्योग उभारणीसाठी अधिकाधिक संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी विधानपरिषद सदस्य नागराज यादव यांनी केली. शहरातील काही सरकारी शाळांची विधानपरिषदेच्या निधीतून विकासकामे करायची असल्यास तांत्रिक अडचणी येत आहेत. त्या दूर कराव्यात, अशी मागणी विधानपरिषदेचे सदस्य साबण्णा तळवार यांनी केली. आमदार राजू सेठ म्हणाले, हिडकल जलाशयातून हुबळी-धारवाडच्या उद्योगांना पाणी नेले जात आहे. या कामासाठी परवानगी दिली नसेल तर हे काम तातडीने थांबावावे, अशी मागणी त्यांनी केली. यावर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, हिडकल जलाशयातील 0.58 टीएमसी पाणी नियमानुसार कित्तूर आणि धारवाड औद्योगिक क्षेत्रांना दिले जाईल. एरोस्पेस, ऑटोमोबाईलसह 11 प्रकारचे उद्योग उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत बोलताना सांगितले. बेळगावात ऑटोमोबाईल इंडस्ट्रिजच्या स्थापनेला चांगली संधी असल्याने जागा शोधून उद्योगपतींना बोलाविण्यात यावे, अशी सूचना यावेळी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केली. बैठकीला लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
नागरिकांना त्रास दिल्यास फायनान्स कंपन्यांवर कारवाई
फायनान्स कंपन्याकडून जनतेला विनाकारण त्रास दिल्यास संबंधितावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली असून याबाबत शनिवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या बैठक घेणार आहेत. त्यानंतर कारवाईची दिशा ठरविली जाईल, असे यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.









