जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन : जिल्हास्तरीय समिती बैठकीत सूचना
बेळगाव : उद्यमबाग येथील औद्योगिक वसाहतीमध्ये विनाकारण कचरा टाकताना आढळून आल्यास त्याच्यावर तातडीने कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी विविध जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. औद्योगिक वसाहतीमध्ये कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी महापालिकेने उपाययोजना राबवाव्यात. शिवाय कचरा टाकणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी. परिसरात कॅन्टीन, हॉटेल आणि कारखान्यांकडून रस्त्यावरच कचरा टाकला जात आहे. त्यामुळे कचरा समस्या गंभीर बनू लागली आहे. यासाठी कडक कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
जि. पं. सीईओ राहुल शिंदे म्हणाले, कारखानदारांनी कचरा विल्हेवाटीसाठी नेमलेल्या ठिकाणीच कचरा टाकावा. महापालिका, बुडा, प्रदुषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्तपणे सर्वेक्षण करून कचऱ्याचे नमुने तपासून संबंधित कारखान्यांना सूचना कराव्यात. ऑटोनगर, होनगा, नावगे, किणये, वाघवडे, देसूर आदी ग्रा. पं. कार्यक्षेत्रातही कचरा टाकणाऱ्यांवर शासनाच्या निर्देशनानुसार दंड आकारणी करावी, अशा सूचना केल्या. या बैठकीला मनपा उपायुक्त विजयकुमार तळवार, कृषी खात्याचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, बागायत खात्याचे सहसंचालक महांतेश मुरगोड, हेस्कॉमचे अधिकारी आणि विविध कारखान्यांचे मालक उपस्थित होते.









