युवा म. ए. समितीच्या शुभम शेळके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैशांचे आमिष तसेच काही साहित्य आणि कुपन वाटप सुरूच आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी अशा राजकीय व्यक्तींवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. तरीदेखील काही ठिकाणी त्याचे वितरण होत आहे. तेव्हा संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके व इतरांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाचे पालन झाले पाहिजे. असे असताना इच्छुक असलेले उमेदवार विविध आमिषे दाखवत आहेत. याबद्दल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पुरावेदेखील दिले आहेत. साहित्य वाटणे किंवा पैशांचे आमिष दाखविणे म्हणजे लोकशाहीला काळीमा फासण्याचा प्रकार आहे. निवडणूक ही नि:पक्षपातीपणे झाली पाहिजे. मात्र, बऱ्याच दिवसांपासून हे प्रकार सुरू झाले आहेत. एकप्रकारे निवडणूक आयोगाचे आदेशच धाब्यावर बसविण्यात येत आहेत. तेव्हा तातडीने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शुभम शेळके, सचिन केळवेकर, मनोहर हुंदरे, नारायण मुचंडीकर, सिद्धाप्पा बसरीकट्टी, भागोजी पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.









