विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाचे निवेदन
बेळगाव : विधानसभा मतमोजणीदिवशी आरपीडी कॉर्नर येथे पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या आहेत. देशविरोधी घोषणा देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याचबरोबर भाजपला मतदान केले म्हणून शिमोगा येथे एका रिक्षाचालकावर हल्ला करण्यात आला आहे. अशा घटना अनेक घडल्या आहेत. तेंव्हा त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करा, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. विधानसभा मतमोजणी 13 मे रोजी पार पडली. यावेळी आरपीडी कॉर्नर येथे पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. अशा तरुणांवर कठोर गुन्हे दाखल करावेत. त्यांना जामीनसुद्धा मिळू नये, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. भटकळ, शिरसी येथे पाकिस्तान ध्वज लावून देशाचा अवमान केला आहे. या देशविरोधी कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. हिंदुंवर कोणत्याही प्रकारचे हल्ले होवू नयेत. यासाठी कायदेशीर कारवाई करून देशातील शांतता राखावी, असेही निवेदनात नमूद केले आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम, विश्व हिंदू परिषदेचे सचिव आनंद करलिंगण्णावर, डॉ. रवी पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.








