हिंदू जनजागृती समितीचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
केंद्र सरकारने अमृतमहोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविला आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये यासाठी दखल घेणे गरजेचे आहे. याचबरोबर प्लास्टिकचे ध्वज विक्री करणाऱयांवर बंदी घालणे गरजेचे आहे. तेव्हा तातडीने प्लास्टिक ध्वज विक्री करणाऱयांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदन देण्यात आले.
तिरंगा ध्वज हा राष्ट्राची अस्मिता आहे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी राष्ट्रध्वज फडकविला जातो. या दिनानिमित्त ध्वजांची विक्री मोठय़ा प्रमाणात केली जाते. मात्र प्लास्टिकचे ध्वज काही वर्षांपासून विक्री होत आहेत. ते ध्वज कोठेही फेकण्यात येतात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होत आहे. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
हिंदू जनजागृती समिती गेली 19 वर्षे राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये म्हणून निवेदन देत आहे. मात्र लहान मुलांच्या हट्टापायी ध्वज दिले जातात. ती मुले रस्त्यावर ध्वज फेकतात. तेव्हा प्लास्टिक ध्वज विक्रीवरच बंदी घालावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुधीर हेरेकर, मारुती सुतार, सविता बोंगाळे, अर्चना लिमये, सदानंद मासेकर, गोपीनाथ महागावकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.









