राज्य भीम सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : नागराळ, ता. रायबाग येथील मादिग समाजासाठी राखून ठेवण्यात आलेल्या स्मशानभूमीच्या जागेवर बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करण्यात आले आहे. घरेही बांधण्यात आली आहेत. सदर अतिक्रमण हटविण्यात यावे, स्मशानभूमीसाठी जागा राखीव ठेवण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन कर्नाटक भीम सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. नागराळ गावाच्या व्याप्तीमध्ये असणाऱ्या सर्व्हे नंबर 133ब मधील 1 एकर 20 गुंठे जमीन रायबाग शहरातील मादिग समाजाच्या स्मशानभूमीसाठी राखीव ठेवली आहे. मंजूर केलेल्या जमिनीवर अनेक जणांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. त्यामुळे स्मशानभूमीसाठी जागा नाहीशी झाली आहे. सदर जागेवर झालेले बेकायदेशीर अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे. याबरोबरच बेकायदेशीररीत्या कागदपत्रे करून घरे बांधणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. या बेकायदेशीर कामांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.
संबंधितांवर कारवाई न केल्यास आंदोलन
खोटी कागदपत्रे तयार करून ग्राम पंचायत विकास अधिकाऱ्यांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे. तत्कालिन ग्राम पंचायत सचिव, गाव तलाठी व इतर अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे. यावेळी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी निवेदन स्वीकारून याची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.









