अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा : जयभीम युवक मंडळ, महिला स्व-साहाय्य गट सदस्यांचे निवेदन
बेळगाव : अगसगे येथील अंगणवाडी सेविकेने महिला स्व-साहाय्य गटाचे तब्बल चार लाख रुपये हडप केले आहेत. हा प्रकार घडून सहा महिने उलटले तरी अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही. यासाठी शनिवारी पुन्हा अगसगे येथील जयभीम युवक मंडळ व महिला स्व-साहाय्य गट संघाच्या सदस्यांनी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी महिला व बालकल्याण खाते, जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायतीला निवेदन सादर केले आहे. संबंधित अंगणवाडी सेविका व अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र धरणे आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. गावातील आंबेडकर गल्लीमध्ये एकूण चार संघ आहेत. त्यामध्ये अक्कमहादेवी स्व-साहाय्य संघ, रमा स्व-साहाय्य संघ, आंबेडकर अभिवृद्धी स्व-साहाय्य संघ, रमाबाई आंबेडकर स्व-साहाय्य संघ आहेत.
सबसिडी मिळवून देण्याची मागणी
प्रत्येक संघामध्ये दहा महिला आहेत. अशा चार संघामध्ये चाळीस महिला आहेत. याना महिला व बालकल्याण खात्याकडून प्रत्येकी दहा हजार रुपये सबसिडी देण्यात आली होती. असे एकूण चार लाख रुपये सबसिडी देण्यात आली होती. मात्र अंगणवाडी सेविका रेखा पाटील यांनी सबसिडीच्या चार लाख रुपयांचा स्वत: गैरवापर करून घेतला आहे. तसेच संघाच्या बचत खात्यामधील रकमेचा देखील गैरवापर केला आहे. याबाबत महिला स्व-साहाय्य गटाच्या चारही संघांनी अंगणवाडी सेविका रेखा पाटील यांच्यावर कारवाई करावी म्हणून दि. 27 मार्च 2023 रोजी महिला व बालकल्याण खात्याच्या उप-निर्देशकांना निवेदन दिले होते. मात्र तीन महिने उलटले तरी कोणतीच कारवाई झाली नसल्यामुळे दलित महिलांच्या सबसिडीचा गैरवापर करणाऱ्या अंगणवाडी सेविका, सीडीपीओ सुखसीर यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना निलंबित करावे व दलित महिला स्व-साहाय्य संघाच्या महिलांना त्वरित सबसिडी मिळवून द्यावी. अन्यथा संबंधित खात्याच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यावेळी जयभीम युवक मंडळाचे अध्यक्ष यल्लाप्पा मेत्री, दलित प्रगतीपर सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवपुत्र मेत्री, सेफ वार्ड संस्थेचे अध्यक्ष संतोष मेत्री, दलित नेते मल्लेश चौगुले, सिद्धाप्पा कांबळे, लक्ष्मण मॅगेरी, सरोजा कोलकार, इरव्वा मेत्री, सुधा कोलकार, शोभा कोलकार आदी महिला उपस्थित होत्या.









