जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
चित्रदुर्ग मुर्घा मठाच्या स्वामींनी केलेले कृत्य हे समाजाला काळिमा फासणारे आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करा, या मागणीसाठी कर्नाटक भीमसेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. दलित अल्पवयीन मुलींवर हा अन्याय झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित स्वामींवर कारवाई करावी, असेही या निवेदनात म्हटले आहे.
स्वामींनी अनुसुचित जाती-जमातीतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल होवून आठ दिवसानंतर अटक करण्यात आली आहे. केवळ दबावातून ही अटक झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रामाणिक अधिकाऱयांची नेमणूक करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तातडीने त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे होते. मात्र कारवाई करण्यास विलंब करण्यात आला आहे. सरकार त्यांना पाठिशी घालत आहे, असा आरोप करण्यात येत आहे. सदर स्वामींवर 376(2)(एन), 376(3) यासह पोक्सोसह कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता अटक झाली आहे. मात्र साक्षी तसेच इतर कागदपत्रे दाखल करताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्या स्वामींना शिक्षा करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी शशिकांत तळवार, भीमाप्पा दोड्डमनी, लक्ष्मण पाटील, दीपा कांबळे, नहीस मुजावर, संतोष चितळे, दीपक कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते..









