फोंडा : फोंडा तालुक्यातील एका माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शारीरिक शिक्षकांसह सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या शाळा व्यवस्थापनाविरोधातही कठोर कारवाई करावी अशी मागणी मडकई येथील ग्रामस्थांनी केली आहे. याप्रकरणी तपासाची गती व जाब विचारण्यासाठी मडकई येथील ग्रामस्थ काल रविवारी सकाळी म्हार्दोळ पोलीस स्थानकात एकवटले होते. पिडीत विद्यार्थैनीने स्वत:च्या हस्ताक्षरात म्हार्दोळ पोलीस स्थानकात तक्रार नोंद करेपर्यंत शाळा व्यवस्थापन काय करीत होते. याला सर्वस्वी विद्यालयाची धुरा सांभाळणारे मुख्याध्यापक यांना जबाबदार धरावे अशी मागणीही यावेळी बोलताना ग्रामस्थांनी दिली. शारीरिक शिक्षकाविरोधात यापुर्वी पाच तक्रारी असल्याची माहिती असूनही शाळा व्यवस्थापनाने प्रत्येकवेळी प्रकरणे दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजकीय दबवाखाली यावेळी प्रकरण दाबून ठेवू नये यासाठी मडकई येथील ग्रामस्थांनी म्हार्दोळचे पोलीस निरीक्षक यांना संशयिताविरोधात कठोर कारवाई करण्याची विनंती केली.
विद्यालयाचे नाव बदनाम या कारणास्तव तक्रारी दडपून ठेवल्या
केवळ विद्यालयाचे नाव बदनाम होईल या कारणास्तव आजपर्यंत विनयभंगाची शिकार झालेल्या पिडीतावर अन्याय झालेला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. सदर घटनेनंतर पिडीत विद्यार्थीनीवर सद्या शाळा सोडण्याची परिस्थिती ओढवलेली आहे. पिडीत मुलगी या घटनेमुळे प्रचंड मानसिक ताणावाखाली असून या घटनेनंतर तिच्या लहान बहीणीवरही परिणाम झालेला असून तिनेही शाळा सोडली आहे. व्यवस्थापन मंडळानेही याप्रकरणी कोणतेच सहानुभूती न दाखविल्यामुळे आज या पिडीत कुटूंबियावर बिकट परिस्थिती ओढावलेली आहे. त्या शिक्षकांनी एका महिला शिक्षिकांचाही विनयभंग केल्याचा माहिती यावेळी ग्रामस्थ राजेश नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
विनयभंगप्रकरणी मुख्याध्यापक, शिक्षक व शारीरिक शिक्षकावर गुन्हा नोंद
याप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की विनयभंगप्रकरणी शारीरिक शिक्षकाविरोधात भा.दं.सं. 354, गोवा बाल कायदा 2003 चे कलम 8 (2) व पॉस्को कायद्याचे कमल 12 आणि 8 अंतर्गत गुन्हा नेंदविण्यात आलेला आहे. तसेच त्यानंतर सदर प्रकरणाची राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने दखल घेतल्यानंतर विनयभंगाची तक्रार पिडीतेने प्रथम एका शिक्षिकेच्या कानावर घातली होती. याप्रकरणी मुख्याध्यापकांनाही तेवढेच जबाबदार धरून त्याच्याविरोधात पोक्सो कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात यावा असे आदेश जारी केलेले आहे. त्यानंतर मुख्याध्याक, महिला शिक्षिका व शारीरिक शिक्षक यांनी अटकेपासून बचावासाठी अटकपुर्व जामीनअर्ज केलेला आहे. अटकपुर्व जामीन अर्जावर येत्या मंगळवारी 5 सप्टे. रोजी बालन्यायालयात सुनावणी होणार असल्याचे म्हार्दोळचे निरीक्षक मोहन गावडे यांनी सांगितले आहे.









