कोल्हापूर :
ज्या भागात प्रदूषणयुक्त घडामोडी होत आहेत. तेथील प्रदूषणकारी घटकांवर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी तत्काळ कारवाई करावी असे निर्देश पुणे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने दिलेल्या आदेशानुसार पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत करावयाच्या उपाययोजनांवर देखरेख व समन्वयासाठी नियुक्त केलेल्या समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले, ग्रामपंचायत किंवा महापालिका क्षेत्रात सांडपाण्यावर प्रक्रिया न करता नाल्यातून किंवा प्रत्यक्ष नदीपात्रात जात असेल तर अशा ठिकाणी संबंधितांवर कडक कारवाई करा. या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, नगरप्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, अशासकीय सदस्य उदय गायकवाड यांच्यासह संबंधित प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व इतर सदस्य उपस्थित होते.
- साखर कारखान्याची तपासणी करा
ग्रामीण भागात हॉटेल्स, हॉस्पिटल आदी ठिकाणी होणारे प्रदूषण रोखण्यासाठी तालुकास्तरावर विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना अध्यक्षांनी केल्या. मोहीम राबवित असताना प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी अशा ठिकाणांची तपासणी करून ज्या ठिकाणी सांडपाणी, घनकचरा निर्माण होऊन पाण्यात मिसळत आहे त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना केल्या. जिह्यातील साखर कारखान्यांची नियमित तपासणी करून त्या ठिकाणी सांडपाण्यावर कशाप्रकारे विल्हेवाट लावली जाते याची तपासणी करा. तसेच ज्यांनी याबाबत चांगल्या उपाययोजना सुरू केल्या आहेत त्यांची यशोगाथा तयार करून ती प्रसिद्ध करा. यातून इतरांनाही प्रदूषण रोखण्यास मदत होईल असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी एसटीपीची कामे होईपर्यंत ब्लिचींग, डोसींग करण्याचे काम चालु ठेवून पाण्याचे नमुने घेवून त्याचे पृथ:करण करण्याच्या सूचना केल्या. आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांनी एसटीपीबाबत तातडीने प्रक्रिया राबवून कामे सुरू करू. सर्व ठिकाणी कार्यादेश देण्यात आले आहेत अशी माहिती दिली. तसेच जलपर्णीबाबतही उपाययोजना केल्या जात आहेत अशी माहिती दिली. उदय गायकवाड यांनी ग्रामपंचायत स्तरावरील वाढते उद्योग व व्यवसाय यामधून येणाऱ्या सांडपाण्याबाबत बैठका घेऊन ठोस उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी केली.
- ग्रामपंचायत स्तरावर तातडीने उपाययोजना राबवा
मागील बैठक 25 मे 2024 रोजी झाली होती. यावेळी समितीने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी झाली का याबाबत आढावा घेण्यात आला. महापालिका क्षेत्रात जोपर्यंत उर्वरित एसटीपी कार्यरत होत नाहीत, तोपर्यंत तात्पुरत्या उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. याबाबत महापालिका क्षेत्रात काम झाले. परंतु ग्रामपंचायत स्तरावर अजून कामे झालेली दिसून येत नाहीत. याबाबत तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. जयंती नाला झोन येथील 9 एमएलडी, दुधाळी 6 एमएलडी, बापट कॅम्प 15 एमएलडी व दुधाळी मस्कुती तलाव 19.50 एमएलडी एसटीपीची कामे तातडीने सुरू करून याबात प्रत्यक्ष काम फेब्रुवारी संपण्यापूर्वी सुरू व्हावे अशा सूचना डॉ. पुलकुंडवार यांनी महानगरपालिकेला दिल्या. तसेच इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील 18, 13 व 20 एमएलडी एसटीपीची कामे भूसंपादन प्रकिया तातडीने पूर्ण करुन सुरू करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.








