विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन समितीचा इशारा
पेडणे / प्रतिनिधी
विठ्ठल यशवंत हरिजन यांचा अपघाती मृत्यू होऊन आज तेरा दिवस झाले. परंतु त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकाला पेडणे पोलिसांनी अजूनही पकडले नाही तसेच त्याचा शोधही घेतला नाही. त्यामुळे हरिजन यांच्या कुटुंबाला न्याय देण्यास पेडणे पोलीस आणि सहकारी यंत्रणा अपयशी ठरली आहे. सदर वाहनचालकावर पाच दिवसाच्या आत पोलिसांनी कारवाई न केल्यास पोलीस स्थानकासमोर आंदोलन केले जाईल अशा इशारा बाबासाहेब उद्यान पेडणे येथे विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन समितीतर्फे पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी या पत्रकार परिषदेत कोरगावचे पंचसदस्य दिवाकर जाधव, चोपडेचे पंचसदस्य हेमंत चोपडेकर, बाबलो आगरवाडेकर, चंद्रकांत जाधव, सतीश कोरगावकर, तुकाराम तांबोसकर, अनिल तळवणेकर, प्रमिला, हरी पार्सेकर, सखाराम कोरगावकर, सुभाष केरकर, अर्जुन जाधव, सुहास कांबळे, अॅड. जितेंद्र गावकर, मनोहर गावकर, सुधाकर पेडणेकर, कृष्णा कोरगावकर, हरिश्चंद्र पार्सेकर आदी यावेळी उपस्थित होते.
आमचे एक बंधू विठ्ठल हरिजन यांचा नागझर येथे रस्ता अपघातात वाहनाने ठोकरल्याने मृत्यू झाला. वाहनचालक वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला मात्र याची दखल पेडणे व मोपा पोलिसांनी अजूनपर्यंत घेतलेली नाही. या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी आमच्या संघटनेतर्फे आम्ही करत आहोत. सरकारने योग्य ती दखल घेऊन या वाहनचालकावर गुन्हा नोंद करावा आणि न्याय द्यावा अशी मागणी दिवाकर जाधव यांनी केली.
विश्वभूषण समितीतर्फे अन्यायग्रस्त आमचे बंधू आणि इतर समाजातील घटकावर अन्याय झाल्यास आम्ही आवाज उठवतो. आज तेरा दिवस होऊनही पोलीस यंत्रणा काहीच काम करत नसल्याने आम्हाला याठिकाणी पत्रकार परिषद घ्यावी लागली. पाच दिवसाच्या आत संबंधित संशयित गुन्हेगाराला पोलिसांनी अटक न केल्यास पोलीस स्थानकावर मोर्चा नेऊन आंदोलन छेडण्यात येईल, असे बाबलो आगारवाडेकर यांनी सांगितले.
या भागाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी याप्रकरणी लक्ष घालून विठ्ठल हरिजन यांच्या कुटुंबाला न्याय द्यायला हवा होता. मात्र तसा प्रकार अजूनही घडलेला नाही, असे जितेंद्र गावकर म्हणाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित व्यक्तीची तपासणी करून त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करावी. या भागाच्या आमदाराने यात विशेष लक्ष घालून या गरीब कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी सुभाष केरकर यांनी केली.