विश्व हिंदू परिषदेची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : हरियाणातील नूंहमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेला इस्लामिक जिहादी संघटना कारणीभूत आहेत. विश्व हिंदू परिषदेकडून काढण्यात आलेल्या ब्रजमंडल पदयात्रेवर दगडफेक करून मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली आहे. सदर इस्लामिक संघटनांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन विश्व हिंदू परिषद व बजरंग दलतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. हरियाणातील नूंह जिल्ह्यातील फिरोजपूर झिरका येथील नल्हड गावामध्ये नलहरेश्वर महादेव मंदिर आहे. सदर मंदिर पांडवकालीन असल्याने या मंदिराला ऐतिहासिक महत्त्व आहे. या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेकडून ब्रजमंडल पदयात्रा काढण्यात आली होती. या पदयात्रेवर इस्लामिक जिहादी संघटनांकडून दगडफेक केले आहे. यामध्ये अनेक भाविक जखमी झाले आहेत. महिलांसह अनेकजण जखमी झाल्याने मोठा हिंसाचार घडला आहे. वाहनांना आग लावण्यात आली आहे. दोघा गृहरक्षकांचा मृत्यू झाला आहे. बजरंग दलच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक करण्यात आल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. ही अत्यंत दुखद घटना असून याचा तीव्र शब्दात विश्व हिंदू परिषदेकडून निषेध करण्यात आला. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांचा तात्काळ तपास घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी, हिंदू समाजाच्या अशा पदयात्रांवर वारंवार केले जाणारे हल्ले चिंताजनक बाब आहे. इस्लामिक संघटनांच्या वाढत्या कृत्यांवर सरकारने वेळीच पायबंद घालावेत, अन्यथा हिंदुत्ववादी संघटनाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.









