कोलार जिल्ह्यातील घटना : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : मल्लूर (जि. कोलार) तालुक्यातील यलावहळ्ळी गावातील मोरारजी देसाई शाळेमधील विद्यार्थ्यांना ड्रेनेज सफाई करण्याचे काम लावलेल्या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अशा मागणीचे निवेदन ऑल इंडिया सफाई मजदूर काँग्रेस संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मोरारजी देसाई वसती शाळेमध्ये मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कायद्यानुसार विद्यार्थ्यांना ड्रेनेज सफाई करायला लावणे गुन्हा आहे. हे माहीत असूनही शिक्षकांकडून जाणीवपूर्वक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लक्ष करून ड्रेनेज सफाईचे काम लावण्यात आले आहे. ही अत्यंत घृणास्पद बाब आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय करण्यात आला आहे. हा एक प्रकारे गुन्हाच आहे. याची दखल घेऊन सरकारने संबंधित शाळेच्या शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी सफाई मजदूर संघटनेतर्फे करण्यात आली आहे. सरकारने ही बाब गांभीर्याने घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, शाळेच्या शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन शिरस्तेदार एस. एम. परगी यांना देण्यात आले. यावेळी काशिराम चव्हाण, कल्लाप्पा चौगुले, राजेंद्र कांबळे, रमेश शिरोटे, पी. एल. रजपूत, श्रीनिवास तळवार आदी उपस्थित होते.









