डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघाची मागणी : हलगी वाजवून केले ठिय्या आंदोलन
बेळगाव : महानगरपालिकेच्यावतीने अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेले लॅपटॉप सुमार दर्जाचे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक झाली असून यामध्ये सहभागी असलेल्या एजन्सी आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघ यांच्यावतीने यापूर्वी मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यावर अद्याप कोणतीच कार्यवाही न झाल्याने बुधवारी महापालिकेवर हलगी वाजवून ठिय्या आंदोलन करण्यात आले. महापालिकेकडून एससीएसटी विद्यार्थ्यांना 123 लॅपटॉप वितरित करण्यात आले आहे. सदर लॅपटॉपची किंमत 25 ते 30 हजार असली तरी ते 50 हजार रुपयांचे असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत. तसेच त्यामधील सॉफ्टवेअर देखील कमी दर्जाचे आहेत. ज्या एजन्सीने लॅपटॉप पुरविले आहेत, त्यांच्याकडून सुमार दर्जाचे लॅपटॉप देण्यात आले आहेत. लॅपटॉपांचा दर्जा तपासून गुणवत्ता पत्र देण्याची जबाबदारी एनआयसीकडे आहे. मात्र, त्यांनी देखील गुणवत्ता पत्र दिलेले नाही.
एससीएसटी विद्यार्थ्यांची फसवणूक
एकंदरीत एससीएसटी विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यासह फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे यामध्ये सहभागी असलेल्या एजन्सी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघ यांच्यावतीने 24 एप्रिल 2025 रोजी याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मनपा आयुक्तांकडे करण्यात आली होती. पण अद्यापही त्यावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने बुधवारी महापालिकेवर हलगी आंदोलन करण्यात आले.









