बेळगाव : नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल अनुद्गार काढणारे मध्यप्रदेशचे मंत्री कुवर विजय शाह यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस समिती (अल्पसंख्याक) ने केली आहे. सदर आशयाचे निवेदन मंगळवारी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. कर्नल सोफिया यांना दहशतवाद्यांची बहीण असे प्रक्षोभक विधान करणे हे अत्यंत निंदनीय आहे. संसदीय दर्जाच्या एका लोकप्रतिनिधीने असे विधान करणे हे केवळ धोकादायकच नव्हेतर नैतिकतेला धक्का पोहोचविणारे, शिवाय असंतोष निर्माण करणारे आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
अशा पद्धतीचे कोणतेही विधान आमच्या लष्कराच्या सन्मानाला धक्का देणारे ठरते. कर्नल सोफिया कुरेशी यांनी देशाची सेवा निष्ठेने केली असून त्या प्रशंसेस आणि सन्मानास पात्र आहेत. कॅबिनेट मंत्री म्हणून शाह एक महत्त्वाचे पद भूषवितात. अशा पदावरील व्यक्तीने असे विधान करणे अशोभनीय आहे. त्यामुळे सोफिया यांच्या संदर्भात अवमानजनक विधान करणाऱ्या कुवर शहा यांच्यावर चौकशी समिती नेमावी. तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 153 अ, 295 अ आणि 505 अन्वये त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. जिल्हा काँग्रेस समितीचे चेअरमन अब्दुल गफार घीवाले व मन्सूर अली अत्तार यांनी केली आहे.









