चलवादी महासभेची मागणी ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन
बेळगाव : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चलवादी महासभा जिल्हा शाखेने केली आहे. महासभेच्या पदाधिकारी व सदस्यांनी बुधवारी (दि. 8) जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, न्यायाधिशांवर बूट फेकण्याचा प्रकार हा निंद्य व निषेधार्ह आहे. लोकशाही, संविधान, कायदे, सर्वजन हित या तत्वांवर कारभार चालणाऱ्या या देशाला ही घटना कलंक लावणारी असून, दलितवर्ग कदापि खपवून घेणार नाही.
वकीलच न्यायाधिशांवर बूट फेकत असेल तर…
सामान्य जनतेवर अन्याय होत असल्यास ती न्यायालयाकडे दाद मागत असते. न्यायाधीश, वकील किंबहुना न्यायालय आपणाला न्याय देईल, अशी आशा जनता बाळगून असते. मात्र, एखादा वकीलच न्यायाधिशांवर बूट फेकण्याची कृती करीत असेल तर जनतेने कोणाची कीव करावी? ही कृती म्हणजे केवळ एकाच व्यक्तीवर हल्ला नव्हे तर लोकशाही व्यवस्थेवर विश्वास ठेवून असलेल्या न्याय, नीती धर्म, तत्वावर हल्ला आहे. दोषी वकिलावर कारवाई न झाल्यास अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते. संबंधित वकिलावर कारवाई होईतोवर चलवादी महासभा आंदोलन करीतच राहील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष दुर्गेश मेत्री यांच्यासह हणमंत मधाळे, कुमार दरबारे, शंकर नडोणी व अन्य सदस्य उपस्थित होते.









