► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पद्म पुरस्कार विजेत्यांकडून पुरस्कार प्राप्तीसाठी लेखी मान्यतापत्र घेण्यात यावे, अशी महत्वाची सूचना वाहतूक, पर्यटन आणि संस्कृती संसदीय समितीने केली आहे. अनेक पुरस्कार विजेते नंतर राजकीय कारणांसाठी पुरस्कार परत करतात. यामुळे देशाची मानखंडना होते. तसे होऊ नये म्हणून लेखी मान्यतापत्र घेण्यात यावे, असे या संसदीय समितीने केंद्र सरकारला कळविले आहे.
सध्याच्या पद्धतीनुसार पुरस्कारसाठी निवड झाल्यानंतर संबंधित व्यक्तीची संमती घेण्यात येते. त्याने संमती दिल्यासच त्याचे नाव सूचीत समाविष्ट करण्यात येते. मात्र, पुरस्कार वितरण करत असताना त्याचे लेखी मान्यतापत्र घेतले जात नाही. त्यामुळे सदर व्यक्ती नंतर पुरस्कार परत करण्यास मोकळी राहते. बरेच पुरस्कार राजकीय कारणांस्तव परत केले जातात. काही वर्षांपूर्वी असा प्रकार मोठ्या प्रमाणात घडला होता. त्यामुळे बरीच खळबळ माजून तो एक मोठा मुद्दा बनला होता. ही पुरस्कार वापसीची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक व्यक्ती पुरस्कार परत करण्यासाठीच घेत असतात. कारण घेतलेला पुरस्कार परत केल्यानंतर त्यांना मोठी प्रसिद्धी मिळू शकते. तसेच सरकार आणि देश यांची प्रतिमा डागाळते. म्हणून संबंधिताचे लेखी मान्यतापत्र घेऊनच पुरस्कार द्यावेत. पुरस्कार परत करणार नाही, अशी अट मान्पता पत्रात असावी. असे झाल्यास देशाची नाहक मानखंडना होणार नाही, असे या समितीचे म्हणणे आहे.









