वृत्तसंस्था/नवी दिल्ली
यजमान ताजिकिस्तानने येथे बुधवारी खेळविण्यात आलेल्या मित्रत्वाच्या फुटबॉल सामन्यात भारताच्या 23 वर्षांखालील वयोगटाच्या फुटबॉल संघाचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात मध्यंतराला भारताने 1-0 अशी आघाडी मिळविली होती. या सामन्यात 33 व्या मिनिटाला भारताचे खाते सुहेल अहमद भट्टने उघडले. भारताचा दुसरा गोल पार्थीब सुंदर गोगोईने 85 व्या मिनिटाला नोंदविला. ताजिकस्थानतर्फे अॅन्सोर खेबीबोव्हने 59 व्या मिनिटाला तर मोहम्मदीइक्बाल डेव्हॅलटोव्हने 91 व्या मिनिटाला गोल केले. ताजिकिस्तानचा तिसरा आणि निर्णायक गोल 95 व्या मिनिटाला (दुखापतीच्या कालावधीत) मोहम्मदअली अझीजबोव्हने केला. या सामन्यात उत्तरार्धात भारतीय संघातील आयुष छेत्रीला 10 मिनिटांच्या कालावधीसाठी मैदानाबाहेर काढण्यात आले. छेत्रीने पंचांची मैदानात हुज्जत घातल्याने ही कारवाई त्याच्यावर करण्यात आली. त्यामुळे भारताला या सामन्यात 10 खेळाडूंनीशी खेळावे लागले.









