भुवन बामची पहिली वेबसीरिज
भुवन बामने देशातील टॉप युटय़ूबर्समध्ये सामील होत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आतापर्यंत स्वतःच्या युटय़ूब चॅनेलपुरती मर्यादित राहणाऱया भुवनची कक्षा आता वाढत आहे. भुवनने ओटीटीच्या जगतात पाऊल ठेवले आहे. विनोदी अभिनेत्याची पहिली सीरिज ‘ताजा खबर’ डिस्ने हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारण्यासह भुवनने याच्या निर्मितीत वाटा उचलला आहे.

या सीरिजमध्ये श्रिया पिळगावकर, महेश मांजरेकर, जेडी चक्रवर्ती, देवेन भोजानी, शिल्पा शुक्ला, प्रथमेश परब, आणि नित्या माथूर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसून येणार आहेत. हुसैन आणि अब्बास यांनी याची कथा लिहिली आहे. ताजा खबर एक मजेशीर सीरिज असून यात ऍक्शन, ड्रामा आणि रोमांस देखील आहे. मानवी आकांक्षा आणि उतार-चढाव यात दिसून येईल असे भुवनने म्हटले आहे. हिमांक गौड दिग्दर्शित ताजा खबर सीरिज 6 जानेवारी रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे.
श्रिया पिळगावकर यात कॉलगर्लची भूमिका साकारत आहे. यापूर्वी मी अशाप्रकारची भूमिका साकारली नव्हती. गिल्टी माइंड्समध्ये वकील आणि ब्रोकन न्यूजमध्ये न्यूज अँकर झाल्यावर या कॉमेडी सीरिजमध्ये ही भूमिका साकारणे माझ्यासाठी नवा अनुभव असल्याचे श्रियाने म्हटले आहे.









