अँटी-ड्रोन सिस्टम बसवणार : हवाई हल्ल्यापासून पूर्णपणे सुरक्षित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्तर प्रदेशातील आग्रा येथील जागतिक वारसा असलेल्या ताजमहालमध्ये दररोज मोठ्या संख्येने पर्यटक ताजमहाल पाहण्यासाठी येतात. ताजमहालची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी आणि संभाव्य हवाई धोक्यांना तोंड देण्यासाठी लवकरच संकुलात अँटी-ड्रोन सिस्टम बसवण्यात येईल. सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ताजमहालला लवकरच प्रगत ‘ड्रोन न्यूट्रलायझेशन’ तंत्रज्ञानाच्या स्वरूपात अतिरिक्त सुरक्षा वाढ देण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी रविवारी येथे सांगितले.
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला हल्ला आणि त्यानंतर भारताने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर निर्माण झालेल्या चिंता लक्षात घेऊन ताजमहालची सुरक्षा अत्याधुनिक करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानने भारतातील विविध भागात ड्रोन हल्ल्यांचे प्रयत्न केले होते. तथापि, भारतीय सुरक्षा दलांनी असे सर्व प्रयत्न हाणून पाडले. पाकिस्तानच्या हल्ल्यांमध्ये भारताचे कोणतेही नुकसान झाले नसले तरी भविष्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन महत्त्वाच्या पर्यटनस्थळांचा सुरक्षाविषयक आढावा घेतला जात आहे. युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेले ताजमहाल हे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करणारे आघाडीचे पर्यटनस्थळ असल्यामुळे तेथील सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे.
‘ताजमहाल संकुलात ड्रोनविरोधी यंत्रणा बसवली जाईल. या प्रणालीची रेंज सात ते आठ किलोमीटर असेल. तथापि, ते ताजमहालच्या मुख्य घुमटापासून 200 मीटरच्या त्रिज्येत काम करेल, असे सहाय्यक पोलीस आयुक्त सय्यद अरीब अहमद यांनी रविवारी सांगितले. कोणताही ड्रोन ताजमहालजवळ येताच, ड्रोनविरोधी यंत्रणा त्याचा सिग्नल तोडून तो पाडेल. ड्रोनविरोधी यंत्रणा चालविण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच एक प्रतिसाद पथक तयार केले जात आहे. हे प्रतिसाद पथक ड्रोन ट्रॅक करेल आणि पडलेल्या ठिकाणी जाईल. पुढील काही दिवसांत अँटी-ड्रोन सिस्टीम बसवली जाईल, असेही सहाय्यक पोलीस आयुक्तांनी सांगितले.









