श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिह्यात रविवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा एक दहशतवादी मारला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. इर्शाद अहमद भट असे या दहशतवाद्याचे नाव असून तो बारामुल्लाच्या पट्टण येथील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्याकडून एक रायफल, 2 मॅगझिन आणि 30 राऊंड जप्त केल्याचे ट्विट काश्मीर झोन पोलिसांनी केले आहे. शनिवारी संध्याकाळी जिह्यातील बिन्नर भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोधमोहीम सुरू केली. दहशतवाद्याने सुरक्षा जवानांवर गोळीबार केल्यानंतर शोधमोहिमेचे चकमकीत रुपांतर झाले. याचदरम्यान जवानांनी इर्शाद भट याचा खात्मा केला.









