वृत्तसंस्था/ बँकॉक
रविवारी येथे झालेल्या थायलंड खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धैत तैवानच्या 27 वर्षीय आणि द्वितीय मानांकित ताय त्झु यिंगने ऑलिंपिक चॅम्पियन चीनच्या चेन युफेईचा पराभव करत अजिंक्यपद पटकाविले.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात ताय त्झु यिंगने चीनच्या युफेईचा 21-16, 17-21, 21-12 अशा गेम्समध्ये पराभव करत आपल्या मागील पराभवाची परतफेड केली. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदकासाठी ताय त्झु यिंग आणि युफेई यांच्यात अंतिम लढत झाली होती आणि युफेईने हा सामना जिंकून सुवर्णपदक मिळविले होते. गेल्यावर्षी थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत ताय त्झु यिंगला अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मॅरीनकडून पराभव पत्करावा लागला होता. या स्पर्धेत पुरूष एकेरीतील जेतेपदासाठी मलेशियाचा सहावा मानांकित जिया आणि चीनचा शिफेंग यांच्यात अंतिम लढत होत आहे.









