वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेतून नुकताच भारतात प्रत्यार्पित झालेला मुंबई हल्ल्याचा एक प्रमुख सूत्रधार तहव्वूर राणा याने न्यायालयात अर्ज सादर केला आहे. आपल्या कुटुंबाशी आपल्याला दूरध्वनीवरुन संपर्क करण्याची अनुमती देण्याची मागणी त्याने या अर्जात केली आहे. यासंदर्भात न्यायालयाने एनआयएला नोटीस पाठविली आहे.
राणा हा सध्या राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकरणाच्या (एनआयए) कोठडीत आहे. दिल्लीच्या रोज अॅव्हेन्यू न्यायालयाने त्याला 18 दिवसांची एनआयए कोठडी दिली आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. मुंबई हल्ल्याच्या कारस्थानाचे अनेक रहस्ये त्याच्याकडून हस्तगत केली जातील अशी शक्यता व्यक्त होत आहे.
23 एप्रिलला सुनावणी
तहव्वूर राणा याच्या प्रकरणात 23 एप्रिल या दिवशी पुढची सुनावणी करण्यात येणार आहे. त्या दिवशी त्याच्या कोठडीचा कालावधी संपत आहे. तथापि, एनआयएकडून कोठडीच्या कालावधीत वाढ मागितली जाण्याची शक्यता आहे. मुंबईवरचा हा हल्ला 2008 मध्ये झाला होता आणि त्याची सूत्रे पाकिस्तानातून हलविली गेली होती. तहव्वूर राणा, दाऊद गिलानी ऊर्फ डेव्हिड कोलमन हॅडली, तसेच लष्करे तोयबा या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिझ सईद आणि या संघटनेचे अनेक म्होरके या कटाचे सूत्रधार होते. 2013 मध्ये तहव्वूर राणा याला अमेरिकेत अटक झाली होती आणि त्याला तेथे शिक्षाही झाली होती. आता त्याचे भारताला प्रत्यार्पण करण्यात आले असून भारतात त्याच्यावर नव्याने आरोपपत्र सादर करुन अभियोग चालविला जाणार आहे.
200 हून अधिक लोकांचा बळी
26 नोव्हेंबर 2008 या दिवशी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 200 हून अधिक निरपराध नागरिकांचा बळी गेला होता. पाकिस्तानातून भारतात घुसलेल्या 10 दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. या हल्ल्याचा कट पाकिस्तानात शिजला होता. तसेच दहशतवाद्यांना पाकिस्तानातून सूचना केल्या जात होत्या. दहशतवाद्यांनी जवळपास दोन दिवस मुंबईतील ताजमहाल हॉटेल आपल्या ताब्यात ठेवले होते. नंतर भारतीय सेनेने मुंबईची सुटका केली होती. 10 पैकी 9 पाकिस्तानी दहशतवादी या हल्ल्यात मारले गेले होते. मात्र, अजमल कसाब हा एक दहशतवादी जिवंत सापडला. त्याच्यावर अभियोग चालवून त्याला नंतर मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती. भारतात आतापर्यंत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामधला सर्वात भीषण हल्ला असे याचे वर्णन केले जाते.









