सिद्धरामय्या तपास यंत्रणांच्या रडारवर : आघाडीच्या नेत्यांमधील भेटी-गाठी वाढल्या
प्रतिनिधी/ बेंगळूर
म्हैसूर नगरविकास प्राधिकरणाच्या (मुडा) जमीन वाटप प्रकरणाबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कोणतीही चूक केलेली नाही. त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे काँग्रेसचे नेते उघडपणे सांगत आहेत. असे असूनही काँग्रेसमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेल्या आघाडीच्या नेत्यांनी एकमेकांच्या भेटी घेऊन सल्लामसलत केल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात लोकायुक्त पोलिसात एफआयआर दाखल होऊन तपास सुरू झाला असताना काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. अनेक नेते विकासकामांच्या बहाण्याने एकमेकांच्या भेटीगाठी घेत चर्चेत गुंतले आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षांतर्गत राजकीय घडामोडी घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेले उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्यात सोमवारी खलबते झाली. एत्तीनहोळे पाणीपुरवठा प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील अडचणी सोडविण्याच्या निमित्ताने उभय नेत्यांच्या भेटीवरून विविध अर्थ काढले जात आहेत.
काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनीही डॉ. जी. परमेश्वर यांची भेट घेऊन चर्चा केली होती. सोमवारी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी डॉ. जी. परमेश्वर यांची त्यांच्या बेंगळुरातील सदाशिवनगर येथील निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांच्या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिल्यास पुढील राजकीय पावले काय असतील यावर या दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचे बोलले जात आहे.
आगामी मुख्यमंत्री कोण? या मुद्द्यावर सर्वांचे एकमत व्हायला हवे, यात मतभेद नकोत. हायकमांडच्या निर्णयानुसारच नेत्याची निवड करावी, असे मत उपमुख्यमंत्री डी. शिवकुमार यांचे आहे. मात्र, मुख्यमंत्रिपद रिक्त झाल्यास ते मिळविण्यासाठी आतापासून सर्व ज्येष्ठ नेत्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी ते नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यानुसार त्यांनी डॉ. जी. परमेश्वर यांची भेट घेऊन त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.
शिवकुमार यांनी नाकारली राजकीय चर्चा
डॉ परमेश्वर यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना डी. के. शिवकुमार यांनी डॉ. जी. परमेश्वर यांच्याशी राजकीय चर्चा झालेली नाही. मी एत्तीनहोळे पाणीपुरवठा योजनेवर चर्चा करण्यासाठी गृहमंत्र्यांची भेट घेतली आहे. विकास झाला तर राजकारण करता येईल. आम्ही राजकारणावर चर्चा केलेली नाही, असा पुनरुच्चार केला.
दिलेला शब्द पाळला!
राज्यातील जनतेला विकास करण्याचे आश्वासन देऊन आम्ही सत्तेवर आलो आहे. त्यानुसार दिलेला शब्द पाळला आहे. आम्ही यापूर्वीच गॅरंटी योजना जारी केल्या आहेत. यापुढील विकासाच्यादृष्टीने काय केले पाहिजे याबाबत चर्चा झाली आहे. एत्तीनहोळे योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणी सोडवण्याबाबत आम्ही चर्चा केली आहे, असेही ते म्हणाले.