आमदार कार्यालयाचा व्हिडिओ शेअर करत रविंद्र नेगींचा आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत 27 वर्षांनी भाजप सत्तेवर परतला आहे. परंतु निवडणुकीनंतरही आम आदमी पक्ष आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोपांचे सत्र थांबलेले नाही. याचदरम्यान पटपडगंजचे भाजप आमदार रविंद्र नेगी यांनी आप नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सिसोदिया यांनी विधानसभा कँम्प कार्यालयातून एसी, टीव्ही, टेबल, खूर्ची आणि पंखा चोरला असल्याचे म्हणत नेगी यांनी याप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठविणार असल्याचे सांगितले आहे.
आप नेते अन् पटपडगंजचे माजी आमदार सिसोदिया यांनी निवडणुकीपूर्वीच स्वत:चा खरा चेहरा दाखविला होता, आमदार कार्यालयातून एसी, टीव्ही, खूर्ची आणि पंखाच त्यांनी चोरून नेला आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराने आता कळस गाठला असल्याचे नेगी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे. सिसोदिया आणि त्यांच्या टीमने आमदार कार्यालयातून सामग्री गायब केली आहे. कार्यालय पूर्णपणे रिकामी करण्यात आले आहे. आप नेते चोर असल्याची टीका रविंद्र नेगी यांनी केली आहे.
कार्यालयातून सुमारे 250-300 खुर्च्या, 2-3 लाखाचा टीव्ही, 12 लाखाची साउंड सिस्टीम गायब झाली आहे. सिसोदिया आणि त्यांच्या टीमने शासकीय संपत्ती चोरण्यासोबत त्याला नुकसानही पोहोचविले आहे, कार्यालयाचे दरवाजे फोडण्यात आल्याचा आरोप भाजप आमदाराने केला आहे. पटपडगंज मतदारसंघात आम आदमी पक्षाने अवध ओझा यांना उमेदवारी दिली होती. या मतदारसंघाचे तत्कालीन आमदार सिसोदिया यांनी जंगपुरा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. नेगी यांनी अवध ओझा यांना 28,072 मतांनी पराभूत केले होते. तर जंगपुरा मतदारसंघात सिसोदिया देखील पराभूत झाले होते.









