वृत्तसंस्था / नवी दिल्ली
योग्य पर्याय न मिळाल्याने बीसीसीआयने आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी टी. दिलीप यांची पुन्हा नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2024-25 च्या बॉर्डर-गावसकर चषक मालिकेत भारताच्या खराब कामगिरीनंतर बीसीसीआयने गेल्या महिन्यात दिलीप आणि साहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्याशी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. ‘दिलीप हा एक चांगला प्रशिक्षक आहे. ज्याने तीन वर्षांहून अधिक काळ संघाची चांगली सेवा केली. तो यापैकी बहुतेक क्रिकेटपटूंना जवळून ओळखतो. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या मोठ्या मालिकेसाठी त्याला संघात घेतल्याने संघाचेच भले होईल,’ असे या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी सांगितले. बीसीसीआय नवीन क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून परदेशी नाव निवडण्यास खूप उत्सुक होते. परंतु आवश्यक वेळी प्रशासकीय मंडळ ते करु शकले नाही म्हणून या टप्प्यावर नवीन नाव आणण्यात काही अर्थ नाही. दिलीप खेळाडूंमध्येही खूप लोकप्रिय आहे, असेही ते म्हणाले. त्यांच्या आधीच्या कार्यकाळात दिलीपने काही लोकप्रिय उपाय सुरू केले होते. जसे की सामन्याच्या दिवशी सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला पदके देणे किंवा पदके वाटण्यासाठी काही दिग्गजांना आणणे. इंडिया अ चे प्रशिक्षक माजी भारतीय खेळाडू ऋषिकेश कानिटकर असतील आणि त्यांना रायन टेन डुशेट (फलंदाजी) आणि ट्रॉय कुली (गोलंदाजी) मदत करतील.









