33 पंचायतीमधून 995 उमेदवार रिंगणात, 229 वॉर्ड.458 पोलीस तैनात : 6 जणांची बिनविरोध निवड
प्रतिनिधी /म्हापसा
बार्देश तालुक्यातून एकूण 33 पंचायतीसाठी येत्या बुधवार दि. 10 ऑगस्ट रोजी होणाऱया पंचायत निवडणुकांचा प्रचार अखेर सोमवारी सायं. 5 वा. समाप्त झाला. बार्देश तालुक्यातून एकूण 995 उमेदवार आपले नशीब आजमावित आहे. एकूण आढावा घेतला असता बार्देश तालुक्यात एकूण 11 पंचायतीमध्ये पती-पत्नी पंचायत निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
शिरसईमधून गोकुळदास कांदोळकर व गीता कांदोळकर, थिवीमधून तुळशीदास व तृप्ती शिंदे, नास्नोळामधून श्री. व सौ. तृप्ती बांदोडकर, हणजूणमधून पोमालदीन व पेद्रु डिसोझा, गिरीमधून फोंडू व मिलन नाईक आणि अंजुस व कार्मेलिना फ्रॅन्को, नेरूलमधून पियादाद व नासिसो आल्मेदा, वैर्ला काणकामधून निकोल व व्हेनेसा या मुलगी आणि आई रिंगणात आहेत. बार्देशसाठी तीन मामलेदार असून त्यात राहुल देसाई मुख्य मामलेदार तर अनिल राणे सरदेसाई व कृष्णा गावस या संयुक्त मामलेदारांचा समावेश आहे.
पोलीस निवडणुकीत सज्ज
दरम्यान बार्देश तालुक्यातून एकूण 458 पोलीस पथक निवडणुकीसाठी सज्ज ठेवण्यात आले असून सोमवारी सायंकाळी पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी या सर्वांना म्हापसा पोलीस स्थानकात बोलावून घेऊन निवडणूक विषयी त्यांना मार्गदर्शन करून सूचना केल्या. यावेळी हणजूण पोलीस निरीक्षक प्रशल देसाई, कोलवाळ निरीक्षक सोमनाथ माजिक, म्हापसा निरीक्षक परेश नाईक उपस्थित होते. त्यांनीही आपापल्या पथकास मार्गदर्शन केले.
रविवारी प्रचाराला जोर
रविवारी दिवसभर उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. सोमवारी सायंकाळी प्रचाराची सांगता झाली. त्यामुळे शेवटच्या दिवशी पंचायत निवडणुकीचा प्रचार बराच रंगला. रविवार सुट्टी असल्याने अनेक उमेदवारांनी घरी जाऊन प्रचार केला. यावेळी त्यांचे समर्थकही उपस्थित होते. गेले 15 दिवस सुरू असलेल्या या प्रचाराची सोमवारी सांगता झाली. राज्यात 10 ऑगस्ट रोजी 186 पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत 5 हजार 38 उमेदवार रिंगणात उतरले आहे. या सर्व उमेदवारांनी आपला प्रभाग पिंजून काढला आहे. घराघरात जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या जात आहे. बुधवारी मतदान होऊन 12 रोजी उमेदवारांचे भवितव्य कळणार आहे.
सर्व उमेदवारांना निवडणूक आयोगाने 40 हजार रुपये निवडणूक खर्च दिला आहे. यातही आर्थिक बंधन घातले असून त्यापेक्षा जास्त खर्च करता येणार नाही त्यामुळे बहुतेक उमेदवारांनी घरी जाऊन प्रचारावर जास्त भर दिला आहे. अनेक प्रभागांमध्ये दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढत होणार आहे. आतापर्यंत 64 उमेदवार हे बिनविरोध निवडून येणार हे निश्चित झाले आहे. बार्देश तालुक्यात एकूण 33 पंचायतीमधून 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
मतमोजणी परिसरातील बार, रेस्टॉरंट, दुकाने बंद
पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंचायत निवडणुकीच्या दिवशी 10 ऑगस्ट रोजी मतदान केंद्रापासून 200 मीटर परिसरात बार, रेस्टॉरंट, दुकाने, गाडे सकाळी 6 ते सायं. 6 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आले आहेत. तसेच मतमोजणी दिवशी 12 ऑगस्ट रोजी मतमोजणी केंद्राच्या परिसरातील बार, दुकाने, रेस्टॉरंट, गाडे सकाळी 6 ते मतमोजणी पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आले आहेत.









