अंतरिम सरकारचे नेतृत्व हाती, शांततेचे आवाहन
वृत्तसंस्था / .दामास्कस
बंडखोरांनी सिरीया देशाचा पूर्ण ताबा घेतल्यानंतर आता तेथे अंतरिम सरकारची स्थापना केली आहे. या सरकारचे प्रमुखपद मोहम्मद अल बशीर यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यांनी युद्धात बंडखोरांचा विजय झाल्याची घोषणा केली असून शांततेच आवाहन केले आहे. मात्र, इस्रायल, अमेरिका आणि तुर्कीये या देशांनी सिरीयावर जोरदार हल्ले केले असून तुर्कीयेने या देशाचा काही भाग घेतला आहे.
अंतरिम सरकार पूर्णपणे स्थापित होण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. तसेच या सरकारचे ऊर्वरित जगाशी संबंध प्रस्थापित होण्यासाठीही आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असे अनुमान आहे. बंडखोरांनी शांतता राखण्याचे आश्वसन दिले असले तरी, अमेरिका आणि इस्रायल यांच्या तेथील घडामोडींवर लक्ष असून तुर्कीये हा देशही सावध आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. इस्रायलने सिरीयातील शस्त्रसाठे नष्ट करण्याचा सपाटा लावला आहे. अमेरिकेच्या विमानांनीही अनेक शस्त्रसाठ्यांवर हल्ले केले आहेत.
इस्रालयची सेना दामास्कसजवळ
सिरीयातील परिस्थिती अस्थिर असल्याने इस्रालयने स्वत:च्या सुरक्षेसाठी त्या देशात सैन्याच्या काही तुकड्या धाडल्या आहेत. इस्रायलचे सैन्यही सिरीयाची राजधानी दामास्कसजवळ पोहचल्याने पुढील घडामोडींविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्यातील इस्रायल आणि बंडखोर यांच्यात कोणताही संघर्ष झालेला नाही. बंडखोरांवर हल्ला करण्याचा विचार नाही, असे इस्रायलच्या भूसेनेने स्पष्ट केलेले आहे. इस्रायलने सिरीयातील रासायनिक शस्त्रसाठे नष्ट केल्याचे वृत्त आहे.
कॉरिडॉरवर नियंत्रण
इस्रायलने सिरीयातून जॉर्डनमधील गोलान टेकड्यांना पोहचणाऱ्या कॉरीडॉरवर नियंत्रण मिळविले आहे. त्यामुळे इस्र ायलची भविष्यात मोठी सोय होणार आहे. तसेच सिरीयाला गोलान टेकड्यांपर्यंत पोहचण्यासाठी मार्ग बंद झाल्याने त्या देशाची कोंडी होण्याची शक्यता आहे. तुर्कस्तानेही सिरीयाच्या पश्चिमेकडचा काही भाग ताब्यात घेऊन आपली सुरक्षा भक्कम केल्याची माहिती देण्यात आली आहे.
कतारचा आक्षेप
सिरीयातील स्थितीचा लाभ इस्रायल घेत आहे, असा आक्षेप कतार या मध्यपूर्वेतील देशाने घेतला आहे. इस्रायलने सिरीयाच्या सार्वभौमत्वावर घाला घालू नये असे आवाहन या देशाच्या विदेश विभागाचे प्रवक्ते माजेद अल् अन्सारी यांनी केले. बंडखोरांना त्यांनी सहानुभूती व्यक्त केली असून शांततेच आवाहन केले.
इराणची कोंडी
सिरीयाचे पदच्युत प्रमुख बशर अल आसद हे इराणचे समर्थक होते. इराणने त्यांना मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि पैशाचे साहाय्य केले होते. मात्र, आता त्या देशात इराणविरोधक आयएसआयएस प्रणित बंडखोरांची सत्ता आल्याने इराणचे मध्यूपर्वेतील वजन आणि प्रभाव यांना ओहोटी लागण्याची शक्यता आहे. आखाती इस्लामी प्रदेशाचे नेतृत्व करण्याच्या स्पर्धेत इराण मागे पडण्याची शक्यता असून सौदी अरेबियाचे वर्चस्व होण्याची शक्यताही अनेक तज्ञ व्यक्त करीत आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून आणि स्वत:चा दबाव टिकवून धरण्यासाठी इराण झपाट्याने अणुबाँब तयार करण्याच्या मागे लागेल, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.
भारतावर परिणाम काय ?
सिरीयातील घडामोडींशी भारताचा थेट संबंध नसला, तरी भारताचे तेथील घडामोडींकडे लक्ष आहे. सत्तांतर सुरळीत झाल्यास तेथे शांतता निर्माण होईल, अशी भारताची अपेक्षा आहे. सिरीयाशी भारताचे संबंध पूर्वीपासून फारसे घनिष्ट नसले तरी तेथील अशांततेमुळे कच्च्या इंधन तेलाच्या किमती वाढल्यास भारताला या संघर्षाची झळ बसू शकते, असे काही तज्ञांचे म्हणणे आहे.









