उचगाव प्रतिनिधी
मराठा आरक्षणाचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. संपूर्ण राज्यभरात याचे पडसाद उमटताना दिसत आहे.कोल्हापूर जिल्ह्यात ही मराठा समाज आक्रमक झाला आहे. दरम्यान मनोज जरांगे – पाटील यांच्या लढ्याला,आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी उचगाव येथे मंगेश्वर मंदिराच्या चौकात लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
सकल मराठा समाजातर्फे सुरुवातीस उचगाव कमानीजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुख्य रस्त्यावरून रॅली काढण्यात आली. यानंतर मंगेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये सकल मराठा समाज, सर्वपक्षीय कार्यकर्ते यांच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.मराठा आरक्षणासाठी राज्यभर मराठा समाज पेटून उठला असून आंदोलनाला धार आली आहे. जरांगे पाटलांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचे पडसाद गावोगावी उमटून भागाभागात लाक्षणिक उपोषण सुरू झाले आहेत.समाजासाठी शासनाकडून आरक्षण मिळण्यासाठी हीच वेळ असून मराठा समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा द्यावा असे मनोगतात सकल मराठा समाजाच्या वतीने आवाहन करण्यात आले. लाक्षणिक उपोषणात लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा संस्थेचे पदाधिकारी, सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









