शिवसेना या पक्षाला 13 डिसेंबर 1989 रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिले. आता 33 वर्षानंतर 8 ऑक्टोंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने हे चिन्ह गोठवले. 1985 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनच्या उमेदवारांची निशाणी होती मशाल, ढाल -तलवार, नारळाचे झाड, गरूड आणि सिंह, 1987 ची विलेपार्ले विधानसभा पोट निवडणूक शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्यावर जिंकली आणि देशाला दाखवून दिले की हिंदुत्वाच्या मुद्यावर निवडणूक जिंकता येते आणि त्यानंतर शिवसेनेने ‘गर्व से कहो हम हिंदू है’ हा नारा घराघरात पोहचवला, आज शिवसेनेचे धुनष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले असून अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून विलेपार्ले पोटनिवडणूक जशी बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी महत्त्वाची ठरली तशीच आता अंधेरी (पूर्व) विधानसभा निवडणूक उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
शिवसेना आणि धुनष्यबाण हे गेली 33 वर्ष जणू समीकरण बनले होते, मात्र 8 ऑक्टोबरला हे चिन्ह गोठवण्यात आल्याने आता शिवसेनेला कुठले चिन्ह मिळणार याबाबत उत्सुकता लागली आहे. मात्र याच शिवसेनेने 1968 साली झालेल्या मुंबई महापालिका निवडणूकीत त्यांच्या जास्तीत जास्त उमेदवारांची निशाणी ही ढाल -तलवार होती, तर 1970 ला कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत वामनराव महाडीक यांनी उगवता सूर्य ही निशाणी घेऊन निवडणूक लढविली होती, त्यानंतर 1985 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना मशाल, ढाल-तलवार, सिंह, गरूड आणि नारळाचे झाड या निशाणी होत्या. राजकीय पक्षांच्या चिन्हांचा विचार करता मतदान करताना चिन्ह महत्त्वाचे समजले जाते, लोकांना सहज बोध होईल, त्यांच्या लक्षात राहील आणि प्रचाराच्या दृष्टीने सोपे असेल, असंच निवडणूक चिन्ह घेणं कोणत्याही राजकीय पक्षाला आवडतं. 1952 मध्ये काँग्रेसचे निवडणूक चिन्ह होत मानेवर जू असलेली बैलजोडी हे कुठेही लोकप्रिय होणारं चिन्ह होतं. तर जनसंघाची पणती होती आमची खूण दिपक दिपक असा गजर जनसंघाची प्रचारयात्रा करायची पण तेव्हा त्यांच्या दिपकचा उजेड पडला नाही. त्यानंतर हळूहळू प्रादेशिक पक्षांचे पेव फुटले आणि विविध चिन्हे खऱया अर्थाने निवडणूक प्रचारात झळकायला लागली. प्रादेशिक पक्षांचा उगम झाल्यानंतर मुलायम सिंग यांच्या समाजवादी पक्षाचे सायकल हे चिन्ह आहे तेच चिन्ह आंध्रात तेलगु देशमचे आहे तर शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह शिबु सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाचे आहे.
एखाद्या पक्षात फुट पडते तेव्हा तर निवडणूक चिन्हाला फार महत्त्व येते. वाद कोर्टात जाताच जसे आता शिवसेना या पक्षाबाबत झाले, त्याप्रमाणे या आधी जनता पार्टी यांचा नांगरधारी शेतकरी, जनसंघाची पणती, जनता दलाचे चक्र, समता पक्षाची मशाल, सोशलिस्ट पार्टीची झोपडी तर 1992 साली शेतकरी कामगार पक्षाचे खटारा हे चिन्ह गोठवण्यात आले होते. तर मूळ काँग्रेस पक्षाचे गाय-वासरु हे चिन्ह त्या पक्षात फुट पडल्यानंतर गोठवण्यात आले होते. मात्र त्याकाळी लोक निरक्षर असल्याने त्यांना बोध होईल आणि दैनंदिन वापरातील चिन्ह राजकीय पक्ष निवडत असत, ज्याचा विसर मतदारांना होणार नाही. उमेदवारांच्या नावापेक्षा त्या काळी चिन्हांना निवडणुकीत महत्त्व होते. राजकीय पक्षांच्या चिन्हांवर उमेदवार निवडून येत असत. त्यामुळे तेव्हा निष्ठेला आणि कार्यकर्त्यांना महत्त्व होतं, मात्र आता काळ बदलला असून आधुनिक तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे चिन्ह लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तितकी मेहनत करावी लागत नाही, पण काहीही झाले तरी राजकारणात चिन्हांपेक्षा संघटन आणि निष्ठेला महत्त्व आहे, हे देशात गाजलेल्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीने दाखवून दिले होते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी साताऱयात त्यावेळी प्रचारासाठी आले होते, त्यामुळे चिन्हांपेक्षा मतदार राजा हा सार्वभौम असल्याने तो कोणासमोर कुठले प्रश्नचिन्ह निर्माण करेल सांगणे कठीण आहे. त्यामुळे आता उध्दव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे गट यांना कोणते चिन्ह मिळते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबईच्या पोटनिवडणूकांमध्ये शिवसेनेचाच वरचष्मा
मुंबईत झालेल्या आतापर्यंतच्या पोटनिवडणूका बघता, शिवसेनेसाठी त्या टर्निंग पॉईंट ठरल्या आहेत. कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतर ऑक्टोबर 1970 मध्ये झालेली सगळय़ात पहिली परळ येथील पोटनिवडणूक, त्यांची पत्नी शिवसेनेच्या विरोधात असताना शिवसेनेने ही पोटनिवडणूक जिंकली. त्यानंतर डिसेंबर 1987 साली झालेली विलेपार्ले येथील डॉ. रमेश प्रभू यांची पोटनिवडणूक शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्यावर जिंकली, त्यानंतर कुलाबा विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार मर्झबान पात्रावाला यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी दिनाझ पात्रावाला यांना तत्कालीन मुंबई काँग्रेस अध्यक्ष मुरली देवरा यांनी पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी नाकारल्यानंतर दिनाझ पात्रावाला यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. फेब्रुवारी 2000 साली झालेल्या या पोटनिवडणुकीत दिनाझ पात्रावाला या विजयी झाल्या. म्हणजे या तीनही पोटनिवडणूकांचा विचार करता, या तीनही जागा शिवसेनेने दुसऱया पक्षाकडून खेचून आणल्या होत्या. त्यानंतर वांद्रे (प.) येथील शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या निधनानंतर एप्रिल 2015 रोजी झालेली पोटनिवडणूक, राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसकडून ही निवडणूक लढविताना थेट मातोश्रीच्या अंगणात येऊन उध्दव ठाकरे यांनाच आव्हान दिले होते मात्र राणेंचा या निवडणुकीत पराभव झाला, ही निवडणूक चांगलीच गाजली होती. फेब्रुवारी 2016 ला शिवसेनेचे पालघर येथील आमदार कृष्णा घोडा यांच्या निधनानंतर झालेली पोटनिवडणूक शिवसेना आणि भाजपने युती म्हणून लढविली होती तर 2019 नंतर झालेल्या पंढरपूर, कोल्हापूर आणि देगलूर या जागांवरसुध्दा थेट शिवसेना विरूध्द भाजप अशी लढत झाली नव्हती, शिवसेना आणि भाजपच्या राजकारणात पहिल्यांदा अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यातच आगामी मुंबई महापालिका निवडणूका आणि राज्यात शिवसेनेत पडलेली फुट बघता ही निवडणूक शिवसेना ठाकरे आणि शिंदे गट तसेच भाजप यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. 14 ऑक्टोबरला या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून 15 ऑक्टोबरपासून या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. त्यामुळे काही दिवसातच चिन्हांचा घोळ संपल्यानंतर पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांचे फटाके ऐन दिवाळीत उडणार आहेत.
प्रवीण काळे








